व्यसनमुक्तीसाठी जिद्दीने लढा
डॉ. अर्चना पवार यांची जनजागृती; उपचार आणि कारवाईचा दुग्धशर्करा योग
राजीव डाके, सकाळ वृत्त सेवा
ठाणे शहर, ता. २७ : डॉक्टरला देवाचा दर्जा दिला जातो. कारण तो देवासारखाच रुग्णाच्या मदतीला धावून जातो, त्याला आरोग्याच्या संकटातून बाहेर काढतो. विठ्ठल सायन्ना सामान्य जिल्हा रुग्णालयात दंत शल्यचिकित्सकपदी कार्यरत असलेल्या डॉ. अर्चना पवार यांनादेखील रुग्णांनी हाच दर्जा दिला आहे. जिल्ह्यातील गावपाड्यांतील तंबाखू, गुटखा, विडीमुळे कर्करोगाची लागण झालेल्यांना त्यांनी मरणाच्या दारातून परत आणण्याचे काम केले आहे. हजारो शालेय विद्यार्थी आणि तरुणांना जीवघेण्या व्यसनातून बाहेर काढले आहे. गुंडांचा रोष पत्करून जिल्ह्यातील हजारो शाळा तंबाखूमुक्त केल्या आहेत.
डॉ. अर्चना कैलास पवार यांचा जन्म एका वंचित घटकात झाल्याने त्यांचे दुःख काय असते, पुरुषांसोबतच महिला, तरुण आणि शालेय विद्यार्थीवर्ग तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनात अडकल्याने त्याच्यासह संपूर्ण कुटुंब कसे देशोधडीला लागते, याची त्यांना जाणीव आहे. त्यामुळेच अशा समाजाचे आपण देणे लागतो, या उद्देशाने त्यांनी दंत विभागाची निवड करून गावपाड्यांतील तंबाखू, विडी, सिगारेट, गुटखा, मशेरी यांसारख्या व्यसनात अडकलेल्यांना त्यातून बाहेर काढण्याचा निश्चय केला. आता त्या विठ्ठल सायन्ना जिल्हा सामान्य रुग्णालयात दंत शल्यचिकित्सक पदावर कार्यरत असून, तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे तोंडाचा कर्करोग झालेल्यांवर उपचार करून जीवनदान देत आहेत.
जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागात जाऊन तंबाखूजन्य पदार्थ्यांच्या सेवनाचे दुष्परिणाम समाजावून सांगत त्यांची व्यसनातून सुटका करण्याचा प्रयत्न करीत आहेत. शाळा, महाविद्यालयांच्या २०० मीटर परिसरात हे पदार्थ विकण्यास बंदी असल्याने त्या अशा ठिकाणी भेटी देऊन दोषींवर कारवाईचा बडगा उचलत आहेत. आतापर्यंत त्यांनी शाळांच्या परिसरात बंदी असलेल्या ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दोन हजार ६९९ जणांवर कोटपा कायाद्यानुसार कारवाई करून त्यांच्याकडून चार लाख ७३ हजार ५२० रुपयांचा दंड वसूल केला आहे. डॉ. अर्चना पवार केवळ कारवाई करून थांबल्या नाहीत, तर या पदार्थांच्या व्यसनात अडकलेल्यांसाठी जनजागृती आणि आरोग्य तपासणीचे शिबिरे लावून तंबाखूमुक्तीचा संदेश दिला आहे.
१० हजार जणांचे समुपदेशन
आजही त्या पायाला भिंगरी बांधल्यासारख्या जिल्ह्यातील ग्रामीण, दुर्गम भागात जाऊन तपासणी शिबिरातून मुख कर्करोग रुग्णांचा शोध घेऊन त्यांना उपचाराच्या कक्षेत घेऊन येत आहेत. आतापर्यंत त्यांनी तंबाखूमुक्त केंद्रात आलेल्या १० हजार २७ जणांचे समुपदेशन करून अनेकांना तंबाखूचे व्यसन सोडण्यास राजी केले आहे. यामध्ये महिलांचाही मोठी संख्या आहे. त्यांच्या पुढाकारातून ठाणे जिल्हा रुग्णालयात संपूर्ण सुसज्ज दंत विभाग उभारण्यात आला. एका छताखाली सर्व उपचारांच्या सुविधा मिळू लागल्या आहेत. अनेक गुंतागुंतीच्या ओरल कॅन्सर रुग्णांच्या शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.
केलेली कामागिरी :
आरोग्य शिबिरे - ४७३
संशयित कर्करुग्णांचा शोध - ५८३
रुग्णांवर बायोप्सी शस्त्रक्रिया - ११९
निदान झालेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया आणि रेफर - ७०
तंबाखूमुक्ती केंद्रात समुपदेशन - १०,०२७
व्यसनमुक्त केलेले - ९२
तंबाखूमुक्त शाळा - २१५४
........................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.