रंगीबेरंगी फुलपाखरांची अनोखी दुनिया
जिल्ह्यात १४७ प्रजातींचा मुक्त संचार
पाली, ता. २७ (वार्ताहर) : पश्चिम घाटाचा मोठा पट्टा, मुबलक झाडेझुडपे व निसर्गसंपदा या संपन्न परिस्थितीमुळे रायगड जिल्ह्यात रंगीबेरंगी फुलपाखरांच्या अनोख्या दुनियेचे दर्शन घडत आहे. १ ते ३० सप्टेंबरदरम्यान देशात फुलपाखरू महोत्सव साजरा केला जातो. जिल्ह्यात फुलपाखरांच्या तब्बल १४७ प्रजाती आढळतात. शिवाय ब्ल्यू मॉरमॉन हे राज्य फुलपाखरू आणि पश्चिम घाटामधील सर्वात मोठे व दुर्मिळ सदर्न बर्ड विंग हे फुलपाखरू जिल्ह्यात सर्वत्र पाहायला मिळते. येथे येणारे पर्यटक व प्रवासी या फुलपाखरांना पाहण्यासाठी आवर्जून थांबतात.
फुलपाखरांचे फूड प्लांट येथे आढळतात. फुलपाखराची मादी ही मीलनानंतर लगेचच तिला हवे असलेले झाड शोधते आणि त्यावर अंडी घालते. त्यामध्ये कडुनिंब, कढीपत्ता, सीताफळ, रामफळ, लिंबू, कदंब, अशोक अशी झाडे येतात. सोनटक्का, पानफुटी अशा छोट्या झाडांवरही ग्रास डीमन, रेड पियरो अशी सुंदर फुलपाखरे वाढतात, असे फुलपाखरू अभ्यासक प्रवीण कवळे यांनी सांगितले. यंदा लांबलेल्या पावसामुळे फुलपाखरांच्या स्थलांतरावर थोडा परिणाम झाला आहे. दरम्यान, फुलपाखरांची दुनिया बहरत आहे.
फुलपाखरांसाठी जिल्ह्यात सुरक्षित पर्यावरण आहे. घराशेजारील परसबागेत विविध फुलपाखरे यावीत म्हणून अनेक जण फूड प्लांट लावतात. शिवाय पपई, पेरू अशी पिकलेली फळे किंवा सडका बांगडा मासा आपल्या घराच्या अंगणात ठेवून फुलपाखरांना आकर्षित करता येते.
- शंतनू कुवेस्कर, फुलपाखरू अभ्यासक, माणगाव
जगात फुलपाखरांच्या सुमारे १७ हजार ५०० जाती आहेत. भारतात फुलपाखरांच्या सुमारे १,५०० जाती तर महाराष्ट्रात सुमारे ३४५ जाती आढळून येतात. त्यातील तब्बल १४७ प्रजाती एकट्या रायगड जिल्ह्यात आढळून येतात. त्यामध्ये प्रामुख्याने राज्य फुलपाखरू राणी पाकोळी (ब्ल्यू मॉरमॉन), बहुरूपी, गुलाबी राणी, पितांबरी, सांजपरी, हळदी-कुंकू, नील भिरभिरी, मयूर भिरभिरी व शुष्क पर्ण अशा विविध प्रकारच्या फुलपाखरांच्या प्रजातींचा समावेश आहे.
- प्रवीण कवळे, फुलपाखरू व प्राणी-पक्षी अभ्यासक, अलिबाग
या फुलपाखरांच्या अधिवसाचे संवर्धन होणे आवश्यक आहे. फुलपाखरू परागीकरणास खूप मोठ्या प्रमाणात सहाय्य करतात. त्यामुळे ती जैवविविधता राखण्यासाठी उपयुक्त आहेत.
- समीर शिंदे, वनक्षेत्रपाल, कांदळवन, अलिबाग
फूड प्लांटला मागणी
तीनवीरा धरणाजवळ खास फुलपाखरांसाठी खासगी उद्यान केले आहे. फुलपाखरांचे फूड प्लांट असलेल्या झाडांना सध्या अधिक मागणी आहे. लोक आपल्या परसबागेत किंवा खास फुलपाखरांसाठी छोटे उद्यान करून तेथे ही झाडे लावतात व फुलपाखरांना आकर्षित करतात. आणि विविध रंगेबिरंगी फुलपाखरांचे निरीक्षण करतात, असे पालीतील ग्रीनटच नर्सरीचे मालक अमित निंबाळकर यांनी ‘सकाळ’ला सांगितले.
तणनाशके घातक
पावसाळ्याच्या सुमारास नर-मादीचा संयोग होतो व मादी झाडांच्या पानांवर अंडी घालते. काही जातींच्या माद्या अंडी झुडपांवर घालतात, मात्र जिल्ह्यात तणनाशकांच्या वाढत्या वापरामुळे फुलपाखरांच्या अळ्यांना खाद्य मिळत नाही. यामुळे त्यांचा मृत्यूदेखील होतो. यामुळे तणनाशकांच्या वापरावर मर्यादा येण्याची गरज आहे, असे प्रवीण कवळे यांनी सांगितले.
वाढते औद्योगिकीकरण
जिल्ह्यात औद्योगिकीकरण वेगात सुरू आहे. त्यामुळे झाडेझुडपे, वेली, वनस्पती तोडल्या गेल्याने फुलपाखरांना खाद्य मिळत नाही. त्यांचा अधिवास नष्ट होतो तसेच प्रजननदेखील होत नाही. कारखान्यांमधील प्रदूषकेदेखील फुलपाखरांच्या जीवनक्रमावर प्रतिकूल परिणाम करतात.
फोटो ओळ : जिल्ह्यात आढळणारी विविध प्रजातींची फुलपाखरे.
फोटो ओळ, पाली, शंतनू कुवेस्कर, प्राणी पक्षी व फुलपाखरू अभ्यासक, माणगाव
फोटो ओळ, पाली, प्रवीण कवळे, निसर्ग, फुलपाखरू व प्राणीपक्षी अभ्यासक, अलिबाग
फोटो ओळ, पाली, समीर शिंदे, वनक्षेत्रपाल, कांदळवन, अलिबाग
१७ Attachments
• Scanned by Gmail