पालघर, ता. २७ (बातमीदार) ः पालघर जिल्ह्यात दरवर्षी श्वानदंश रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. २०२२-२३ मध्ये सहा हजार २५६ श्वानदंश आणि एक हजार ७७१ अन्य प्राणी चावण्याच्या घटना नोंदल्या गेल्या. २०२३-२४ मध्ये सात हजार ४३ श्वानदंश व दोन हजार ४६८ इतर प्राणी चावणे घडले. २०२४-२५ मध्ये ही संख्या वाढून आठ हजार १४६ श्वानदंश व तीन हजार २७५ इतर प्राणी चावल्याच्या घटना घडल्या. या तीन वर्षांत जिल्ह्यात रेबीजमुळे पाच मृत्यू नोंदवले गेले आहेत.
दरवर्षी २८ सप्टेंबर रोजी जागतिक रेबीज दिवस साजरा केला जातो. रेबीज या प्राणिजन्य आजाराविषयी जनजागृती करणे आणि त्याचा प्रतिबंध करणे, हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. २००७ पासून हा दिवस जगभर साजरा होत असून तो शास्त्रज्ञ लुई पाश्चर यांच्या पुण्यतिथीनिमित्त पाळला जातो. रेबीजपासून बचाव करण्यासाठी त्वरित उपचार, योग्य लसीकरण आणि जनजागृती हाच प्रभावी उपाय असून, स्वतः सुरक्षित राहा आणि समाजालाही सुरक्षित ठेवा, असा संदेश यंदाच्या जागतिक रेबीजदिनानिमित्त आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे.
रेबीज हा आजार प्रामुख्याने पिसाळलेल्या प्राण्यांच्या लाळेमधून मानवामध्ये पसरतो. कुत्रा, मांजर, लांडगा, कोल्हा, माकड, गाय, म्हैस, तसेच काही देशांमध्ये वटवाघूळ यांच्यामार्फतही हा आजार पसरतो. रेबीज टाळण्यासाठी प्राणी चावल्यानंतर जखम त्वरित साबण व वाहत्या पाण्याने किमान पाच ते दहा मिनिटे धुणे आवश्यक आहे. त्यानंतर वैद्यकीय सल्ल्याने रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण वेळापत्रकानुसार पूर्ण करणे गरजेचे आहे. गंभीर जखमांसाठी लसीबरोबरच इंजेक्शनही आवश्यक ठरते. जखमेवर कोणतेही घरगुती उपाय किंवा इतर पदार्थ लावू नयेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केले आहे.