अपात्रांमुळे लाभार्थ्यांची उपासमार
रेशनिंगचे ९७४ मेट्रिक टन धान्य परत जाण्याची शक्यता
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता.२७ : रायगड जिल्ह्याकरीता मंजूर रेशन धान्य इष्टांकातील धान्याचे वितरण होत नसल्याने विपराविना शिल्लक राहात आहे. एका बाजूला जिल्ह्यातील नागरिकांना धान्य मिळत नसल्याची ओरड होत असताना वाटप होत नसल्याने रायगड जिल्ह्याला दरमहा मिळणारे ९७४ मेट्रिक टन धान्य परत जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये अंत्योदय अन्न योजनेच्या २,१०७ शिधापत्रिका व प्राधान्य कुटुंब योजनेच्या तब्बल ७०,४४२ लाभार्थींच्या धान्याचे वाटप होत नाही. सहा महिन्यांपासून १२,९४५ शिधापत्रिका धारकांनी धान्य घेतलेले नाही. त्यामुळे केंद्राच्या मिशन सुधार मोहिमेअंतर्गत इंटरमिनिस्ट्रियल डेटाबेसमधून विविध कारणांनी अपात्र ठरवण्यात आलेल्या ५४,५४५ लाभार्थींची नावे रेशन कार्ड व्यवस्थापन प्रणालीतून वगळणे आवश्यक आहे. जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी ई-केवायसीचे प्रमाण कमी होईल, या भीतीपोटी पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्यांकडून शिधापत्रिकेमध्ये नवीन नावे समाविष्ट केली जात नाहीत. सद्यःस्थितीत रायगड जिल्ह्यात एकूण १५ तालुके, ४२ शहरे (गणना शहरांसह) व १ हजार ८६० वस्ती असलेली महसुली गावे आहेत. त्याशिवाय जिल्ह्यात एक महापालिका, १० नगरपरिषदा, ६ नगरपंचायती व ८११ ग्रामपंचायती कार्यरत आहेत. या संपूर्ण क्षेत्रामध्ये ग्रामीण व शहरी असे अचूक राष्ट्रीय अन्न सुरक्षेच्या कक्षात येणारे क्षेत्र नव्याने निश्चित करूनच लाभार्थी निवड केली जाणे आवश्यक असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. तसेच सर्वच तालुकास्तरावर अजूनही शिधापत्रिका वितरण व राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान लाभार्थी निवड प्रक्रियेत अनियमितता असल्याने पात्र कुटुंब वंचित आहेत.
----
राष्ट्रीय अन्न सुरक्षेवरील दृष्टीक्षेप
पात्र ग्रामीण लोकसंख्या - ७६.३२ टक्के
पात्र शहरी लोकसंख्या -४५.३४ टक्के
एकूण लोकसंख्या - २६ लाख ३५ हजार ३९४
ग्रामीण लोकसंख्या- १२ लाख ६८ हजार ८८५ व
शहरी लोकसंख्या - ४ लाख ४१ हजार ०७२
अन्न सुरक्षेत पात्र - १७ लाख ०९ हजार ९५७
------
संघटनेने सुचवलेले उपाय
- प्रत्येक गाव, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद व महानगरपालिकेनुसार अचूक कव्हरेज नव्याने ठरविणे.
- मयत, विवाहित व स्थलांतरित सदस्यांची नावे तातडीने वगळणे.
- प्रलंबित ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर विशेष शिबिरे.
- लाभार्थी निवडीच्या प्रक्रियेत पारदर्शकता.
------
९७४ मेट्रिक टन धान्य कमी मिळणार
केंद्र शासनाकडून अंत्योदय योजनेतील धान्यवाटप प्रति व्यक्ती या निकषावर (७.५ किलो प्रति महिना) लागू करण्याची तयारी आहे. या बदलामुळे रायगड जिल्ह्याला दरमहा जवळपास ९७४ मेट्रिक टन धान्य कमी मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे अंत्योदय योजनेमध्ये शक्यतो चार ते दहा सदस्य असलेल्या शिधापत्रिकांचा समावेश करावा तसेच मोठ्या सदस्यसंख्या असलेल्या सर्व शिधापत्रिकांची तपासणी करून त्यांना स्वतंत्र विभक्त शिधापत्रिका देणे अत्यावश्यक आहे.
----
छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य अभियान अंतर्गत सेवा पंधरवड्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने एखादे लाभार्थी निवड प्रक्रिया गतीमान करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. तसेच जिल्ह्यातील गरजू, पात्र कुटुंबांना नक्कीच न्याय मिळेल.
- प्रमोद घोसाळकर, अध्यक्ष-रायगड जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार कल्याणकारी संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.