नवे विजेचे खांब टाकण्याचे काम सुरू
कल्याण, ता. २८ (बातमीदार) ः कल्याण पूर्वेतील विजयनगर परिसरात विजेच्या पुरवठ्याच्या सुधारणा आणि सुरक्षिततेसाठी जुने, निकृष्ट दर्जाचे खांब काढून त्याऐवजी टिकाऊ नवे खांब उभारण्याचे काम सुरू आहे. जुन्या खांबांमुळे होणाऱ्या अपघातांचा आणि विजेच्या पुरवठ्यातील अडथळ्यांचा विचार करता, महावितरणने या कामाला प्राधान्य दिले आहे. या कामांमध्ये मुख्य वाहिनीवरील विद्युत प्रवाह दुपारच्या सत्रात तात्पुरता खंडित करण्यात आला होता, ज्यामुळे काही भागांमध्ये वीजसेवा थोड्या वेळासाठी बंद राहिली. नवीन खांब उभारणीसाठी नऊ मीटर खोल खड्डे खोदले जात असून, सिमेंट किंवा लोखंडी खांब वापरले जात आहेत. या उपाययोजनांमुळे भविष्यात विजेचा पुरवठा अधिक सुरक्षित आणि अखंड राहील, असे महावितरणकडून सांगण्यात आले आहे. नागरिकांनी वीजसेवा खंडित होण्याबाबत सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.