ग्रंथालयाच्या माध्यमातून ज्ञानाचा प्रसार
ग्रंथपाल डॉ. नेहा जोशी यांच्या शोधनिबंधांची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल
मुंबई, ता. २७ ः मुंबई आणि परिसरातील कष्टकरी, कामगार आणि विद्यार्थ्यांना ज्ञानासोबतच उच्च शिक्षणासाठी विविध प्रकारच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध प्रकारच्या उपक्रमांची अंमलबजावणी करणाऱ्या मुंबईतील ग्रंथपाल डॉ. नेहा जोशी या स्त्रीशक्तीचे एक प्रेरणादायी रूप ठरल्या आहेत. त्यांनी सादर केलेल्या शोधनिबंधांची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे.
डॉ. जोशी या घनश्यामदास सराफ महाविद्यालयात ग्रंथपाल म्हणून कार्यरत असून, येथे ग्रंथपालाचे कार्य करताना त्यांनी मुंबईजवळच्या परिसरातून येणाऱ्या कष्टकरी, कामगार तसेच विविध घटकांतील असंख्य विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात सामावून घेण्यासाठी राबविलेला उपक्रम लक्षवेधी ठरला आहे.
डिजिटल माहितीचा संग्रह आणि माहितीशास्त्रातील नवे प्रयोग विद्यार्थ्यांसाठी खूप प्रेरणादायी ठरले आहेत. त्यांच्या उपक्रमांमुळे विविध क्षेत्रांत तरुणांना करिअरच्या संधी मिळाल्या. त्यामागे जोशी यांनी केलेले परिश्रम असल्याचे त्यांचे विद्यार्थी सांगतात.
डॉ. जोशी यांच्या कार्याचा प्रवास पाहिल्यास त्या ज्ञानशक्ती, संशोधनशक्ती आणि समाज समावेशकतेच्या एक अनोखे उदाहरण ठरल्या आहेत. त्यांचा ग्रंथालयाच्या क्षेत्रातील कार्याचा आवाका खूप मोठा असून, त्याचा वेळोवेळी गौरवही करण्यात आला आहे. कला महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्र विषयाची पदवी घेतल्यानंतर त्यांनी आपले लक्ष ग्रंथालय व माहितीशास्त्राकडे केंद्रित केले. एसएचपीटी स्कूल ऑफ लायब्ररी सायन्समध्ये त्यांनी बॅचलर व मास्टर्स पदव्या मिळवल्या. पुढे अलागप्पा विद्यापीठात एम.फिल आणि अखेरीस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २०१६मध्ये पीएचडी पूर्ण केली.
डिजिटल युगात सामाजिक माध्यम हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही, तर ज्ञानाचा शोध घेण्यासाठी एक सक्षम व्यासपीठ ठरू शकते, या विषयाला समर्पित असे संशोधन करून त्यांनी आपली पीएचडी पूर्ण केली. सामाजिक माध्यमांचा लाभ आणि तरुणांचे करिअर अशा विषयावर त्या माध्यमातून त्यांनी सखोल मांडणी केली.
शोधनिबंधासाठी गौरव
जोशी यांनी विविध परिषदा, परिसंवादांमध्ये आपला सहभाग नोंदवून अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी केली. याच पार्श्वभूमीवर त्यांना ‘सर्वोत्तम कर्मचारी पुरस्कार’ मिळाला आहे. तसेच एका आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये ‘सर्वोत्तम शोधनिबंध पुरस्कार’देखील प्राप्त झाला आहे. डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या शैक्षणिक परिषदेच्या सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. सार्वजनिक ग्रंथालय धोरण समितीच्या सदस्य म्हणूनही त्यांचे नामांकन झाले आहे.
विद्यार्थ्यांसाठी उपक्रम
जुनी पुस्तके अत्यल्प दरात विकण्याची सोय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी पुस्तक बँकेच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. पीएचडी संशोधकांना त्यांच्या संशोधन कार्यासाठी मार्गदर्शन केले. पुस्तक परीक्षण, मोठ्याने वाचन, बुकमार्क बनविणे असे विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन केले. ग्रंथ व वाचन चळवळीसाठी विविध पुस्तक प्रदर्शनांचे आयोजन केले.
लक्षवेधी कार्य
डॉ. नेहा जोशी या मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागात अभ्यागत प्राध्यापक म्हणूनही कार्यरत होत्या. त्यांनी अनेक शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम व कार्यशाळांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांचे आतापर्यंत २६ पेक्षा अधिक शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झाले आहेत तसेच संपादित पुस्तकांमध्ये अध्यायही प्रकाशित झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.