अतिवृष्टीमुळे ऑक्टोबरपर्यंची संचमान्यता ग्राह्य धरावी
शिक्षक आमदार ज. मो. अभ्यंकर यांची शालेय शिक्षणमंत्र्यांकडे मागणी
मुंबई, ता. २८ ः मागील आठवड्यात राज्याच्या विविध भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे शाळा बंद ठेवाव्या लागल्या. परिणामी शाळांतील विद्यार्थ्यांच्या नियमित हजेरीवर परिणाम झाला आहे. यासोबत शाळांतील अभिलेख व्यवस्थापन विस्कळित झाले आहे. काही भागांमध्ये अनेक शाळा अजूनही बंद असून, शालेय शिक्षण विभागाने ३० सप्टेंबरपर्यंत देण्यात आलेली पटसंख्येची योग्य नोंद होऊ शकत नाही. या पार्श्वभूमीवर ३० सप्टेंबरऐवजी ३१ ऑक्टोबरपर्यंतची पटसंख्या संचमान्यतेसाठी ग्राह्य धरावी, अशी मागणी शिक्षक आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली आहे.
अभ्यंकर यांनी आपल्या निवदेनात पूरपरिस्थितीमुळे राज्यातील शाळांची यू-डायस प्लस या पोर्टलवर माहिती भरण्याच्या प्रक्रियेतही अडचणी निर्माण झाल्या आहेत. अनेक ठिकाणी इंटरनेट उपलब्ध नाही. काही ठिकाणी शाळांचे अभिलेख भिजल्यामुळे झालेल्या अडथळ्यांमुळे ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आलेली नाही. त्यामुळे संबंधित माहिती भरण्यासाठी मुदतवाढ देणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शाळांची मान्यता, अनुदान, शिक्षक संख्या आणि सेवासुरक्षा या सर्व गोष्टी पटसंख्येवर अवलंबून असल्याने चुकीची आकडेवारी शैक्षणिक व्यवस्थेवर विपरीत परिणाम करू शकते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा सुरक्षेसाठी ३१ ऑक्टोबर ही तारीख पटसंख्या नोंदणीसाठी ग्राह्य धरावी, अशी मागणी त्यांनी केली असल्याचे शिक्षक सेनेचे कार्याध्यक्ष जालिंदर सरोदे यांनी सांगितले.