जग अनुभवण्यासाठी ‘चल गं सखी’
बदलापूरच्या सोनल सुर्वेचा महिलांसाठी अभिनव उपक्रम
मोहिनी जाधव : सकाळ वृत्तसेवा
बदलापूर, ता. २८ : जग कितीही पुढे गेले असले तरीही स्त्रिया जुन्या रूढी-परंपरांमध्ये अडकून पडल्या आहेत. आजही एकटीने घराबाहेर पडताना त्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उभा राहतो. अशा परिस्थितीत बदलापूर येथील २५ वर्षीय तरुणी सोनल सुर्वेने ‘चल गं सखी’ ही संकल्पना पुढे आणली आहे. या संकल्पनेचा उद्देश फक्त महिलांना सुरक्षित प्रवासासाठी प्रेरित करणे नाही, तर त्यांना स्वतःसाठी वेळ काढून जीवनाचा आनंद घेता यावा, असे आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून खास महिलांसाठी वेगवेगळ्या सहलींचे आयोजन केले जाते. या सहलीचा मुख्य उद्देश स्त्रियांच्या मनातील भीती दूर करणे तसेच जग अनुभवण्याचा आत्मविश्वास देणे हा आहे. या संकल्पनेअंतर्गत नुकतीच हम्पी येथे जवळपास ४२ महिलांची सहल यशस्वीपणे पार पडली. १८ वर्षांपासून ते ६० वर्षांपर्यंत वयोगटातील महिलांनी या सहलीत सहभाग घेतला.
सोनलचे शालेय शिक्षण बदलापूर येथे झाले असून, पुढे महाविद्यालयीन शिक्षण ठाणे आणि मुंबई येथे पूर्ण केले. नोकरीत रुजू झाल्यानंतर तिला स्वावलंबनाचा अनुभव मिळाला. घरातून मिळालेल्या आधुनिक विचारांमुळे तिला फिरण्याची आणि स्वतंत्रपणे जगण्याची संधी मिळाली. याच अनुभवातून तिच्या डोक्यात ‘चल गं सखे’ ही संकल्पना आली. या सहलीत सोनलने महिलांसाठी संपूर्ण प्रवासाचे व्यवस्थापन स्वतःच केले. रेल्वे तिकीट बुकिंगपासून ते राहण्याची सोय, खाणपिण्यापर्यंत सर्व काही. या सहलीत महिलांना एकत्र येऊन स्वतंत्रपणे, सुरक्षित आणि आनंदाने प्रवास करता येतो, हे अनुभवायला मिळाले. सहलीनंतर महिलांचा आत्मविश्वास वाढला असून, अनेकांनी भविष्यात देश-विदेश फिरण्याचा मानसही व्यक्त केला आहे.
आपल्या देशात आजही अनेक घरांतील महिला या जुन्या रूढी-परंपरांमुळे अडकून पडल्या आहेत. त्यांना घराचा उंबरठा ओलांडून जग पाहायचे आहे; मात्र घराबाहेर पडल्यानंतर आपल्याबाबत काहीतरी वाईट घडेल, ही भीती अनेक महिलांमध्ये असते. त्यामुळे ही भीती दूर करीत सोनलने महिलांना घराबाहेर पडण्याचा आत्मविश्वास दिला आहे. ‘चल गं सखे’ ही संकल्पना फक्त सहली आयोजित करण्यापुरती मर्यादित नाही, तर तिचा उद्देश महिलांना त्यांच्या जीवनातील अनेक जबाबदाऱ्यांपासून काही काळ सुटण्याचा, स्वतःसाठी वेळ काढण्याचा आणि स्वतःशी संवाद साधण्याचा आहे. या सहलीत महिलांना स्वतःसाठी वेळ काढून मोकळेपणाने जगाचा अनुभव घेता आला, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला. अनेक महिलांनी असे सांगितले, की त्यांना आता देशभर तसेच परदेशातही फिरण्याची उत्सुकता वाढली आहे. यामुळे सोनलला अधिक ऊर्जा आणि प्रोत्साहन मिळाले आहे. तिच्या या उपक्रमामुळे स्त्रिया त्यांच्या घरच्या जबाबदाऱ्यांमधून बाहेर पडून स्वावलंबी होण्याचा अनुभव घेत आहेत.
स्वत:चा नव्याने शोध
सोनलच्या ‘चल गं सखे’ संकल्पनेचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे प्रवासाच्या दरम्यान महिलांनी स्वतःशी संवाद साधणे, त्यांच्या मनाचे मोकळे होणे आणि स्वतःला नव्याने शोधणे. आपल्या कुटुंबाच्या, नोकरीच्या आणि सामाजिक जबाबदाऱ्यांमध्ये बुडालेल्या महिलांना त्यांच्या आयुष्यात थोडा वेळ स्वतःसाठी काढण्याची गरज असते. सहलीदरम्यान हा वेळ मिळतो आणि महिलांना पुन्हा नव्या उत्साहाने जीवनाचा सामना करता येतो. यामुळे त्यांचे जीवन अधिक समाधानी आणि आनंददायी होते. सोनलला आगामी काळात कोकण, गोव्याबरोबरच देशभरातील अनेक राज्ये तसेच परदेशात महिलांना फिरवून आणायचे आहे. उंबरठ्याच्या आत अडकलेल्या स्त्रियांना पर्यटनाबरोबरच उंच भरारी घ्यायला लावायची आहे.
सामाजिक उपक्रमांत सहभाग!
सोनल सुर्वे आणि तिच्या मित्रपरिवाराने एकत्रित येऊन ‘ओके देन’ या माध्यमातून आदिवासी पाड्यातील तसेच दुर्गम भागातील अनेक विद्यार्थ्यांना मोफत इंग्रजी धडे देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. इतकेच काय तर या पिछाडलेल्या भागातील मुलांसाठी आणि महिलांसाठी खाऊचे वाटप, त्यांना आवश्यक असणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, इतर अनेक प्रकारे अशा घटकांना मदत करण्यासाठीदेखील सोनल सुर्वे हिचा हिरिरीने सहभाग असतो. या माध्यमातून तिला एक वेगळा मानसिक आनंद आणि समाधान मिळत असल्याचे तिने या वेळी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.