विद्युतनिर्मिती क्षेत्रात पालिकेचे पाऊल
जलविद्युत, सौरऊर्जा, कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पांच्या कामाला वेग
विष्णू सोनवणे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ ः जलविद्युत, सौरऊर्जा आणि कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याचे प्रकल्प उभारून मुंबई महापालिका विद्युत निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल टाकत आहे. मध्य वैतरणा धरण आणि देवनार डम्पिंग ग्राउंड येथे विद्युतनिर्मितीचे प्रकल्प लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहेत. या प्रकल्पांची कामे वेगाने सुरू आहेत.
मुंबई महापालिका मध्य वैतरणा धरणावर १०० मेगावॉट क्षमतेचा संकरित ऊर्जा प्रकल्प उभारत आहे. यात २० मेगावॉटचा जलविद्युत प्रकल्प आणि ८० मेगावॉटचा तरंगता सौरऊर्जा प्रकल्प यांचा समावेश आहे. हा प्रकल्प खासगी कंपनीमार्फत राबवण्यात येत असून, त्यामुळे मुंबई महापालिकेची वीज खर्चात बचत होणार आहे. मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा प्रकल्पांसाठी लागणारी वीज महागडी आहे.
या प्रकल्पाद्वारे महापालिकेकडून ऊर्जानिर्मिती करून वीज खर्चात बचत करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे.
या प्रकल्पातून दरवर्षी सुमारे २०८ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती अपेक्षित आहे. हा प्रकल्प हरित ऊर्जेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानला जातो. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या जागेची परवानगीही प्राप्त झाली आहे. राज्य सरकारने ४.९० हेक्टर राखीव वनजमीन पालिकेकडे देण्यास परवानगी दिली आहे. यामुळे आता वीजनिर्मिती प्रकल्पाच्या प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात केली जाणार आहे.
मुंबई महापालिकेचा देवनार डम्पिंग ग्राउंडवर कचऱ्यापासून वीजनिर्मितीच्या प्रकल्पावर काम सुरू आहे. हा प्रकल्प कचऱ्यापासून वीज निर्माण करेल, ज्याचा वापर महापालिका कार्यालये आणि रस्त्यांवरील विजेसाठी केला जाईल. २०२५-२०२६ या आर्थिक वर्षात हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचे पालिका प्रशासनाचे नियोजन आहे.
देवनार डम्पिंग ग्राउंडवर २० दशलक्ष मेट्रिक टन जुना कचरा जमा झाला आहे या कचऱ्याचे बायोमायक्रोनिंग केले जात आहे. येथे सुमारे एक हजार टन प्रतिदिन इतक्या घनकचऱ्यापासून बायो सीएनजी प्रकल्पासाठी महानगर गॅस लिमिटेड यांच्यासोबत सामंजस्य करार केला आहे.
* जलविद्युत आणि सौरऊर्जातून दरवर्षी निर्माण होणारी वीज - २०८ दशलक्ष युनिट
* पहिल्या टप्प्यातून दरवर्षी अंदाजे ७८.१३ दशलक्ष युनिट्स वीजनिर्मिती होईल.
खर्चात बचत
पिसे-पांजरापूर येथील पालिकेचे जलशुद्धीकरण संकुल या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या विजेवर चालणार आहे. त्यामुळे येथील वीज खर्चात दरवर्षी अंदाजे १२ कोटी सहा लाख रुपयांची बचत होणार आहे
नेटवर्क उभारणार
मध्य वैतरणा प्रकल्पातून निर्माण होणारी वीज मुक्त प्रवेश धोरणानुसार महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेडच्या विद्यमाने ग्रीड नेटवर्कमार्फत वहन केली जाईल. यासाठी मध्य वैतरणा धरणापासून नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीजवळील महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेडच्या विद्यमान ग्रीडपर्यंत १३ किलोमीटर लांबीची स्वतंत्र ट्रान्समिशन लाइन उभारण्यात येईल.
जलविद्युत आणि सौरऊर्जेतून निर्माण होणारी वीज मुंबईसाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी हरित ऊर्जेच्या दिशेने एक प्रेरणादायी पाऊल असेल. या विजेचा उपयोग पालिकेच्या विविध प्रकल्पांसाठी होईल. प्रकल्पांचे काम वेगाने सुरू आहे.
- अभिजित बांगर,
अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.