पाठलाग
नवनीत बऱ्हाटे : सकाळ वृत्तसेवा
दिल्लीतल्या हजरत निजामुद्दीन स्थानकावर पोलिसांनी केलेला पाठलाग. या पाठलागात काही क्षणांतच दोन कट्टरपंथींना बेड्या ठोकण्यात आल्या आणि उघड झाला ‘इसिस’च्या प्रोजेक्ट मुस्तफाचा दहशतीचा कट..! पाकिस्तानस्थित हँडलर्सकडून थेट आदेश घेऊन भारतातील राजकीय नेत्यांच्या हत्येची व दहशतवादी हल्ल्यांची तयारी करणाऱ्या या जाळ्याचा पोलिसांनी थरारक पाठलाग करत देशाच्या सुरक्षा यंत्रणेच्या जागरूकतेची आणि डिजिटल जगात लपलेल्या दहशतीच्या धोक्याची ठळक जाणीव करून दिली.
=====================
अंधार गडद होत असताना दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन स्थानकावर पोलिसांच्या पावलांचा आवाज घुमला… काही क्षणांतच गोपनीय कारवाईचा थरार उलगडला आणि दोन कट्टरपंथी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. शस्त्रांनी सज्ज असलेले हे तरुण ‘इसिस’च्या प्रोजेक्ट मुस्तफाच्या कटासाठी निघाले होते. पण पोलिसांच्या दीर्घ पाठलागानंतर त्यांच्या स्वप्नातील ‘जिहाद’ चकनाचूर झाला. या अटकेनंतर उघड झालेली माहिती देशाला हादरवणारी आहे.
सहा महिन्यांपासून दिल्ली पोलिसांचे विशेष पथक, केंद्रीय तपास यंत्रणा आणि राज्य एटीएस विभागाने एका गुप्त नेटवर्कवर नजर ठेवली होती. व्हॉट्सअँप, टेलिग्राम, इन्स्टाग्रामसारख्या समाज माध्यमांवर काही तरुण अचानक कट्टर झाले होते. त्यांच्या प्रत्येक हालचालीवर पोलिसांचे बारकाईने लक्ष होते. ते कोणाशी बोलतात, कुठे जातात, काय योजना करतात, सर्व गोष्टींचा तपशील हेरला जात होता.
सप्टेंबरच्या एका रात्री पोलिसांच्या गुप्त पथकाने दिल्लीतील हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकावर सापळा रचला. मुंबईकडे परतण्याच्या तयारीत असलेले कल्याणचा आफताब कुरेशी (२५) आणि मुंब्रा रहिवासी सुफियान अबुबकर खान (२०) अचानक पोलिसांच्या घेरावात सापडले. थोड्या झटापटीत दोघांना जेरबंद करण्यात आले. त्यांच्या ताब्यातून ३२ बोरचे दोन पिस्तुले आणि १५ जिवंत काडतुसे सापडली. त्याच क्षणी पोलिसांना खात्री पटली, ही फक्त सुरुवात आहे, मागे अजून मोठे जाळे आहे.
या जाळ्याचा मुख्य नेता झारखंडमधील अशर दानिश (२३) होता. त्याने स्वतःला ‘सीईओ’ आणि ‘प्राध्यापक’ अशी टोपणनावे दिली होती. दानिशने ‘प्रोजेक्ट मुस्तफा’ नावाचा समाजमाध्यमांवर ग्रुप बनवला होता, ज्यामध्ये ४० तरुण जोडलेले होते. यामध्ये कल्याण तसेच ठाण्यातील काही तरुणांचा समावेश होता. तपासात उघड झाले की, तो पाकिस्तानस्थित हँडलर्सशी थेट संपर्कात होता. पलामू आणि बोकारो येथे टाकलेल्या छाप्यांमध्ये त्याच्या खोलीतून सल्फर, नायट्रिक ॲसिड, सर्किट्स, तांब्याच्या प्लेट्स, पिस्तुले आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त केले. निजामाबादचा हुजैफ यमन (२०) याला शस्त्रे आणि स्फोटके तयार करण्याचे प्रशिक्षण दिले होते, तर कामरान कुरेशी (२६) या ऑपरेशनसाठी निधी हाताळत होता. पाकिस्तानशी संपर्क साधताना हे तरुण ‘प्रोफेसर’, ‘सीईओ’, ‘गजवा लीडर’ अशा कोडवर्ड्स वापरत होते. अनस्क्रिप्टेड कॉल्स, डार्क वेब आणि एन्क्रिप्टेड चॅट्स हे त्यांचे मुख्य शस्त्र होते.
मोठा कट रोखण्यात यश
या तरुणांना ऑनलाइन ब्रेनवॉश करून जिहादी प्रचार शिकवण्यात आला होता. सततच्या निगराणीमुळे आम्ही योग्य क्षणी कारवाई केली. या मॉड्यूलचा पूर्णत: भांडाफोड करून देशात दहशतीचा मोठा कट रोखण्यात आला, असे विशेष कक्षाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रमोद कुशवाहा यांनी सांगितलं
---
अटक केलेले आरोपी
अटक झालेल्यांमध्ये झारखंडमधील सूत्रधार अशर दानिश (२३) याच्यासह कल्याणचा आफताब कुरेशी (२५), मुंब्रा येथील सुफियान अबुबकर खान (२०), निजामाबादचा हुजैफ यमन (२०) आणि मध्य प्रदेशातील कामरान कुरेशी उर्फ समर खान (२६) यांचा समावेश आहे. हे सर्व तरुण सोशल मीडियावरून संपर्क साधून पाकिस्तानस्थित हँडलर्सशी थेट संवाद साधत होते.
----
या संपूर्ण नेटवर्कचे उद्दिष्ट
* ‘गजवा-ए-हिंद’च्या विचारसरणीवर आधारित जिहाद उभा करणे
* भारतामध्ये दहशतवादी हल्ल्यांची मालिका घडवणे
* काही राजकीय नेत्यांच्या हत्येची योजना आखणे
* स्वयंसेवी संस्थेच्या आडून जमीन घेऊन ‘अल-शाम’ नावाचे स्वतंत्र क्षेत्र जाहीर करणे
-------
नेवाळीच्या आफताबची पार्श्वभूमी
अटकेत कल्याणचा आफताब कुरेशी सर्वाधिक चर्चेत आला. त्याचे वडील मटण विक्रेते, तर मुलगा दहशतीच्या मार्गावर! सतत मोबाईलवर अतिरेकी व्हिडिओ पाहणे, घरच्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे आणि शेवटी दिल्लीला पळून जाणे. यामुळे त्याच्या कुटुंबात वारंवार वाद व्हायचे. शेवटी पोलिसांच्या कारवाईनंतर संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.