मुंबई

थोडक्‍यात बातम्या रायगड

CD

विकासकामांमुळे गावाच्या प्रगतीला नवी चालना – ना. अदिती तटकरे
रोहा (बातमीदार) : तालुक्यातील लांढर येथे नुकत्याच झालेल्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यावेळी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री नामदार आदिती तटकरे यांनी गावाच्या सर्वांगीण प्रगतीला या कामांमुळे नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. खासदार सुनील तटकरे यांच्या पाठपुराव्यामुळे या भागासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून त्याचा योग्य वापर करून रस्ते, पाणीपुरवठा, सार्वजनिक इमारती आदी सुविधा उभारल्या जात आहेत. यावेळी मंत्री तटकरे म्हणाल्या की, ग्रामस्थांना दिलेली आश्वासने प्रत्यक्षात पूर्ण होताना दिसत आहेत. त्यामुळे जनतेच्या चेहऱ्यावर समाधानाची लहर दिसून येत आहे. विकासात्मक धडाका पाहून मलाही समाधानाची जाणीव होत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला माजी आमदार अनिकेत तटकरे, ज्येष्ठ नेते विजय मोरे, प्रदेश सरचिटणीस सुरेश मगर, तालुका अध्यक्ष विनोद पाशीलकर, कार्याध्यक्ष समीर शेडगे, माजी सभापती शंकरराव भगत, महिला आघाडी अध्यक्षा प्रीतम पाटील, युवक नेते जयवंत मुंढे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे सोहळ्याला उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले.
...........
गड-किल्ले म्हणजे देशाची शान- सुखद राणे
रोहा (बातमीदार)ः तालुक्यातील खांब शिक्षण संस्थेत सुरू असलेल्या शारदोत्सव कार्यक्रमात बोलताना गड-किल्ले अभ्यासक व रायगड भूषण सुखद राणे यांनी गड-किल्ले म्हणजे देशाची शान आणि इतिहासाचा अनमोल ठेवा, असे प्रतिपादन केले. हे किल्ले केवळ दगडमातीचे बांधकाम नसून आपल्या पराक्रमाच्या, बलिदानाच्या आणि संस्कृतीच्या पाऊलखुणा आहेत, असे ते म्हणाले.
राणे पुढे म्हणाले की, या दुर्गम किल्ल्यांमध्ये आपल्या परंपरा आणि संस्कृती जिवंत राहिल्या आहेत. त्यामुळे हे वारसे जतन करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. गड-किल्ले आपल्या देशाच्या वैभवात भर घालतात, त्यामुळे विद्यार्थ्यांनी या वारशाकडे अभ्यासपूर्ण आणि जतनशील दृष्टीने पाहावे, असे त्यांनी आवाहन केले. या कार्यक्रमात विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश जंगम यांनी त्यांचा सत्कार केला. तसेच व्याख्याते राणे यांनी आपल्या ‘इये देशीचे दुर्ग’ या पुस्तकाची प्रत विद्यालयाच्या ग्रंथालयास भेट दिली. विद्यार्थ्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला.
............
खोपोलीत जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा उत्साहात
खोपोली (बातमीदार) ः खोपोली येथील कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलच्या मैदानावर जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा पार पडली. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. १५ तालुक्यांतील सुमारे ३५० हून अधिक कुस्तीपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. मुलींच्या गटातील स्पर्धा पहिल्या दिवशी, तर मुलांच्या दुसऱ्या दिवशी झाल्या. अनेक कुस्ती प्रेक्षणीय ठरल्या. वेध मरागजे, क्षितिजा मरागजे, सुशील पावशे, हंसिका कुंभार आदी खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ करून उपस्थितांची दाद मिळवली. उद्घाटनप्रसंगी युवा उद्योजक विक्रम साबळे, पोलिस निरीक्षक सचिन हिरे, सचिन पवार, सामाजिक कार्यकर्ते तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेते मारुती आडकर, माजी नगरसेवक महादू जाधव यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. पंच म्हणून सावळेराम पायमोडे, रोशनी परदेशी आणि विनोद जाधव यांनी काम पाहिले. या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी क्रीडा शिक्षक व समन्वयकांनी मोठे परिश्रम घेतले.
............
तळा तालुक्यात कृषी अधिकाऱ्यांचा शेतभेट दौरा
तळा (बातमीदार)ः तालुक्यात उपविभागीय कृषी अधिकारी शुभम बोराडे आणि तालुका कृषी अधिकारी संजय घालमे यांच्या नेतृत्वाखाली कृषी अधिकाऱ्यांनी विविध गावांचा दौरा केला. या दौऱ्यात सेंद्रिय शेती, नाचणी आणि तृणधान्य प्रकल्पांचा प्रत्यक्ष आढावा घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. खांबिवली येथे स्थापन झालेल्या ‘जय हनुमान सेंद्रिय शेतकरी उत्पादक गट’ यांची पाहणी करून शेतकऱ्यांनी तयार केलेल्या सेंद्रिय निविष्ठा तपासण्यात आल्या. तसेच रोवळा येथील महिला बचत गटाने उभारलेल्या नाचणी पिकाच्या प्रात्यक्षिकाला भेट देऊन उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या. विठोबा घाडगे यांच्या सलग तूर पिकाची पाहणी तसेच ताम्हाणे येथे चार सूत्री पद्धतीने भात लागवडीचे प्रात्यक्षिक तपासण्यात आले. आत्मा अंतर्गत अनेक शेतकरी प्रयोगांना उपस्थित अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. सहाय्यक कृषी अधिकारी गोविंद पाशमे आणि तंत्रज्ञान व्यवस्थापक सचिन लोखंडे यांची उपस्थिती लाभली.
..................
कराटेपटू शितल गायकवाडला राष्ट्रीय पुरस्कार
खालापूर (बातमीदार) ः तालुक्यातील कराटेपटू व क्रीडा शिक्षिका शितल गायकवाड यांना केंद्र सरकारकडून स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दिल्ली येथील कमानी ऑडिटोरियममध्ये झालेल्या भव्य कार्यक्रमात केंद्रीय कायदामंत्री अर्जुन मेघवाल, ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. देशभरातून विविध क्षेत्रातील १० जणांचा सन्मान करण्यात आला, त्यापैकी क्रीडा क्षेत्रातील प्रतिनिधी म्हणून शितल गायकवाड यांची निवड झाली. त्या खोपोलीतील कराटे स्पोर्ट्स असोसिएशनच्या संस्थापक असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी १०८ सुवर्णपदकांसह असंख्य पदके मिळवली आहेत. मुलींच्या स्वसंरक्षणासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत. केंद्रीय मंत्री रामदास आठवले व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे हा पुरस्कार मंजूर झाला. पुरस्कारानंतर रायगड जिल्ह्यात सर्वत्र त्यांचे कौतुक होत असून क्रीडा क्षेत्रातील तरुणींना त्यांचा आदर्श लाभत आहे.
..............
ॲड. दत्ता पाटील लॉ कॉलेजमध्ये ‘विधिमंथन २०२५’
अलिबाग (बातमीदार)ः अलिबाग येथील ॲड. दत्ता पाटील लॉ कॉलेजमध्ये महाविद्यालयाच्या २५ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचे औचित्य साधून ‘विधिमंथन २०२५’ हा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. प्रमुख उद्घाटक म्हणून जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र सावंत, प्रमुख पाहुण्या शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील आणि प्रमुख वक्ते डॉ. अविनाश कोल्हे उपस्थित होते. कार्यक्रमात कायद्याचे शिक्षण समाजकारणासाठी किती आवश्यक आहे, यावर विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले. चित्रलेखा पाटील यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकीसह प्रगती साधण्याचे आवाहन केले. न्यायाधीश राजेंद्र सावंत यांनी मूलभूत तत्त्वे हाच कायद्याचा पाया असल्याचे प्रतिपादन केले. या प्रसंगी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर समाजसेवेचे महत्त्व समजावून सांगितले. महाविद्यालयातील प्राध्यापक, बार असोसिएशनचे पदाधिकारी आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
................
महसूल सेवा पंधरवड्यात ३६ लाभार्थ्यांना घरांची सनद
पेण (बातमीदार) ः शहरातील बौद्धनगर भागातील ३६ नागरिकांना महसूल सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने घरांच्या सनदा वाटपाचा सोहळा पार पडला. राज्य शासनाने ‘सर्वांसाठी घरे’ या उपक्रमांतर्गत शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुसार नियमित करून सनद देण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी यावेळी झाली. नगरपालिका सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला आमदार रवी पाटील, प्रांताधिकारी प्रवीण पाटील, तहसीलदार तानाजी शेजाळ, नायब तहसीलदार प्रसाद काळेकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. लाभार्थ्यांना सनद मिळाल्यामुळे अनेक वर्षांचा प्रश्न सुटला असून त्यांच्या चेहऱ्यावर दिलासा दिसून आला. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा राबविण्याचे निर्देश असल्याने पेण तालुक्यातील हा उपक्रम गोरगरिबांसाठी मोठा आधार ठरत आहे.
.................
पेणमध्ये एसटी स्थानकात पोलिस चौकी सुरू
पेण (बातमीदार) ः पेण शहरातील एसटी स्थानकात नव्याने उभारलेल्या पोलिस चौकीचे उद्घाटन रायगड पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या हस्ते झाले. त्यांनी या चौकीमुळे शहरातील गुन्हेगारीला आळा बसेल व प्रवाशांना सुरक्षित वातावरण मिळेल असा विश्वास व्यक्त केला. उद्घाटन सोहळ्यात पोलिस उपअधीक्षक जालिंदर नालकूल, पोलिस निरीक्षक संदीप बागुल, एसटी डेपो मॅनेजर अपर्णा वर्तक, नगरपालिका मुख्याधिकारी जीवन पाटील यांसह नागरिक उपस्थित होते. यावेळी दलाल म्हणाल्या की, महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य सदरक्षणाय खलनिग्रहणाय आहे. त्यानुसार नागरिकांच्या सुरक्षेसाठी २४ तास पोलिस तत्पर असतात. स्थानकात चौकी सुरू झाल्याने प्रवाशांना विशेषतः महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळेल. यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजू पिचीका यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
..........................
मुरूडमध्ये माफक दरात भोजनाची सुविधा
मुरूड (बातमीदार) ः तालुक्यातील विनोद मिणमिने यांनी ‘गवळी राजा’ हॉटेल सुरू करून सर्वसामान्य नागरिकांसाठी माफक दरात सकस भोजन उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. सकाळचा अल्पोपहार व दुपारचे जेवण कमी खर्चात देण्यात येणार असून याचा फायदा कामगार व सामान्य नागरिकांना होणार आहे. या हॉटेलचे उद्घाटन युवासेनेचे जिल्हा उपप्रमुख दीपेश वरणकर यांच्या हस्ते झाले. यावेळी तेलवडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रमोद तांबडकर, भाजप युवा नेते राजेश दिवेकर, स्थानिक मान्यवर उपस्थित होते. यावेळी दीपेश वरणकर म्हणाले की, तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता स्वतःचा व्यवसाय सुरू करून प्रगती साधावी. गवळी राजा हॉटेल हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकीसह उद्योजकतेलाही चालना मिळेल, असे मत व्यक्त करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SSC HSC Exam Form : दहावी-बारावीच्या खासगी विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणीसाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

Viral Video : पतीसोबत गरबा खेळताना अचानक कोसळली महिला अन्... हृदयद्रावक व्हिडिओ

Pune News : ११६ कोटीची जमीन नाममात्र दरात हस्तांतरित करा; अजित पवारांच्या जिल्हा प्रशासनाला सूचना

Phulambri News : फुलंब्रीत तिहेरी मृत्यूच्या घटना! विद्युत शॉक, गळफास व विषारी औषधाने तिघांचा बळी

Latest Marathi News Live Update : पंजाबमधील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांनी जाहीर केले पॅकेज

SCROLL FOR NEXT