धो-धो पावसातही पाणीटंचाई
पिसे पंपिंग स्टेशनमध्ये गाळ अडकला
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २९ : मागील दोन दिवसांपासून सलग होत असलेल्या पावसामुळे धरणांच्या पातळीत वाढ झाली असली, तरीही ठाणेकरांना नवरात्रीच्या काळात पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. कारण ठाणे महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशनमध्ये नदीपात्रातील गाळ, कचरा आणि झाडांच्या फांद्यांमुळे गंभीर अडचण निर्माण झाली आहे. पंपिग स्टेशनमधील गाळ काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. असे असले तरी त्यासाठी दोन दिवस लागणार आहेत. त्यामुळे यादरम्यान पाणीपुरवठा मंदावणार आहे. तसेच पुढील दोन ते तीन दिवस ठाणेकरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे.
ठाण्यासह जिल्ह्यातील इतर महापालिकांना पाणीपुरवठा करणारे बारवी धरण तिसऱ्यांदा तुडुंब भरले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतेक सर्वच धरणे भरली असून, नद्याही दुथडी वाहू लागल्या आहेत. त्यामुळे आता वर्षभर ठाणे जिल्ह्याला टंचाईच्या झळा पोहोचणार नाही, अशी आशा व्यक्त केली जात होती, पण आता दोन दिवस झालेल्या पावसामुळे ठाणेकरांच्या तोंडचे पाणी पळणार, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
ठाणे महापालिकेमार्फत दररोज ५९० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा २७ लाख ठाणेकरांना होतो. यात एमआयडीसीकडून १३४, स्टेम कंपनीकडून ११५, मुंबई महापालिकेकडून ९० तर ठाणे पालिकेच्या स्वतःच्या योजनेतून सर्वाधिक २५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. याच पाणीपुरवठ्यावर पावसाचा परिणाम झाला असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.
ठाणे महापालिकेच्या पिसे येथील पंपिंग स्टेशनमध्ये पावसामुळे वाहून आलेला गाळ जमा झाला आहे. नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात कचरा, लाकडाचे ओंडकेही वाहून आल्याने पंपिग स्टेशनची गती मंदावली आहे. भातसा धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिसे येथील पंपाच्या स्टेशनमधील गाळ, कचरा व झाडांच्या फांद्या काढण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. त्यामुळे ठाणे शहराला पाणीपुरवठा तसेच, पाण्यातील अतिरिक्त गढूळपणामुळे शुद्धीकरणाच्या प्रक्रियेवरही परिणाम होत आहे. परिणामी ठाणे महापालिका क्षेत्राकडे कमी प्रमाणात पाणीपुरवठा येत आहे.
पाणी उकळून, गाळून प्या
कपातीच्या काळात पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन पालिकेने केले आहे, पण त्यासोबतच पाणी उकळून आणि गाळून पिण्याचा सल्लाही दिला आहे. पंपिंग स्टेशनमधून पाणी शुद्ध करून पुरवठा केला जाणार आहे, पण गढूळ पाण्यामुळे होणारे संभाव्य आजारपण टाळण्यासाठी ठाणेकरांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी विनोद पवार यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.