सहाय्यक आयुक्तांच्या दालनात गोंधळ
आंदोलनकर्त्यांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल
उल्हासनगर, ता. ३० (वार्ताहर) : उल्हासनगर महापालिकेतून बदलीचे आदेश असूनही दोन प्रशिक्षणार्थी सहाय्यक आयुक्त कार्यरत राहिल्याच्या वादाने महापालिकेत चांगलाच गदारोळ माजला होता. या प्रकरणावरून प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी थेट अधिकाऱ्यांच्या दालनात घुसून घोषणाबाजी व ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. याप्रकरणी आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या आदेशानुसार तब्बल तीन दिवसांनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
२३ सप्टेंबरला राज्य सरकारने सहाय्यक आयुक्त मयूरी कदम व सुनील लोंढे यांची बदली करून त्यांना नवी मुंबई महापालिकेत नियुक्त केले होते; मात्र बदली आदेश असूनही ते दोघे उल्हासनगर महापालिकेत हजेरी लावत असून, शासकीय फायलींवर सह्या करीत असल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाने केला. २६ सप्टेंबर रोजी ठाणे जिल्हाध्यक्ष ॲड. स्वप्नील पाटील, शरद पाटील, शैलेश तिवारी व अन्य सहा कार्यकर्ते महापालिका मुख्यालयात दाखल झाले. दिव्यांग विभागात जाणार, असे सांगून त्यांनी प्रवेश मिळवला, पण त्यांनी थेट सहाय्यक आयुक्त लोंढे यांच्या दालनात धडक दिली.
बदली आदेश झाल्यानंतरही खुर्चीत कसे बसता, असा जाब विचारत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. नंतर सर्व जण दालनाच्या जमिनीवर बसून ठिय्या आंदोलन करू लागले. परिस्थिती चिघळू लागल्याने सुरक्षा अधिकारी यशवंत सगळे यांनी पोलिसांशी संपर्क साधला. तत्पूर्वीच सुनील लोंढे यांनी दालन सोडले. आंदोलकांनी त्यानंतर मयूरी कदम यांच्या दालनात धडक मारली. त्या अनुपस्थित असल्याने त्यांचा फलक खाली उतरवून घोषणाबाजी केली.
उपायुक्त (मुख्यालय) दीपाली चौगले यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी आंदोलकांची समजूत काढत त्यांना बाहेर सोडले. दरम्यान, याप्रकरणी आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी दिलेल्या आदेशानुसार तब्बल तीन दिवसांनी सुरक्षा अधिकारी यशवंत सगळे यांनी पोलिसांत या घटनेबाबत अधिकृत फिर्याद दिली. तक्रारीनुसार आंदोलकांनी विनापरवानगी दालनात प्रवेश करून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करीत तपास सुरू केला आहे.
या प्रकरणामुळे एकीकडे बदलीचे आदेश असूनही अधिकारी महापालिकेत कार्यरत राहणे, तर दुसरीकडे कार्यकर्त्यांनी दालनात घुसून गोंधळ घालणे, या दोन्ही घटनांनी प्रशासनाच्या शिस्तीवर व प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
महापालिकेतील गोंधळप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे. शासकीय कार्यालयीन कामकाजात अडथळा आणणाऱ्यांना कोणतीही मुभा दिली जाणार नाही. महापालिका ही जनतेच्या सेवेसाठीची संस्था आहे. येथे कायद्याचे राज्य आणि शिस्त हीच आमची ओळख आहे. नागरिकांचा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी प्रशासन ठाम आहे. पुढील काळात जर कोणी अशा प्रकारे नियम मोडण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई होईल. उल्हासनगर महापालिका कोणत्याही दबावाला वा गोंधळाला बळी पडणार नाही.
- मनीषा आव्हाळे, आयुक्त, उल्हासनगर महापालिका
शासनाने दिलेले बदली आदेश हे केवळ कागदावरील अक्षरे नसून कायद्याची ताकद आणि प्रशासनाची शिस्त दर्शवितात. अधिकारी असो वा सामान्य नागरिक नियमांचे पालन सर्वांनी करणे बंधनकारक आहे; मात्र उल्हासनगर महापालिकेत बदली आदेश झुगारून काही प्रशिक्षणार्थी अधिकारी खुर्चीला चिकटून बसले आहेत. फायलींवर सह्या करीत आहेत. हा जनतेच्या विश्वासाशी आणि शासनाच्या प्रतिष्ठेशी खेळ आहे. प्रहार जनशक्ती पक्ष अशा प्रकारांना कधीच सहन करणार नाही. आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांना यापुढेदेखील ‘प्रहार स्टाईल’ने धडा शिकवला जाईल, जेणेकरून भविष्यात कोणीही शासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करण्याचे धाडस करणार नाही.
- ॲड. स्वप्नील पाटील, ठाणे जिल्हाध्यक्ष, प्रहार जनशक्ती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.