पावसामुळे भाज्यांचे भाव कडाडले
घाऊकसह किरकोळ बाजारात ३० ते ४० टक्के वाढ
जीवन तांबे
मुंबई, ता. ३० ः गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील बाजारात भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे घाऊकसह किरकोळ बाजारात भाजीपाल्याचे भाव ३० ते ४० टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागत आहे.
महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, मराठावाडासह अन्य जिल्ह्यांतील विविध प्रकारच्या भाज्या मुंबई व नवी मुंबईतील वाशी बाजारात दाखल होत असतात. यंदा जून महिन्यापूर्वीच सुरू झालेला पाऊस अद्याप सुरू असल्याने शेतीपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यातच नवरात्रोत्सवातील उपवास व पितृपक्षामुळे भोपळा, घेवडा, गवार, मटार, बटाटा, मेथी, पालक, कोंथिबीरीप्रमाणे इतर भाज्यांना मागणी वाढली आहे.
सध्या भेंडी, फरसबी, गवार, घेवडा, तोंडली या भाज्यांचे भाव किलोमागे १२० रुपये किंवा त्याहून अधिक झाले आहेत. इतर भाज्यांचे भाव ८० रुपयांच्या वर गेले आहेत. त्यामुळे भाजी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल कमी झाली आल्याची खंत भाजीविक्रेते अमीर शेख यांनी व्यक्त केली.
सध्या पावसामुळे भाज्या खराब होण्याचे प्रमाण अधिक आहे. आमच्यापर्यंत येणाऱ्या एकूण ३० ते ५० टक्के भाज्या या खराब होत असतात. यामुळे भावात वाढ झाली आहे.
- फारूक मुल्ला, विक्रते
पावसाळा व पितृपक्षादरम्यान भाज्यांचे भाव वाढले आहेत. सामान्य लोकांनी जगायचे कसे, असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे कडधान्य खाण्यात समाधान मानत आहोत.
- संगीता शेट्टी, गृहिणी
भाज्यांचे प्रतिकिलो दर
हिरवी मिरची - प्रति किलो १५० रुपये
फ्लॉवर - प्रति किलो १२० रुपये
फरसबी - प्रतिकिलो १२० रुपये,
घेवडा - प्रतिकिलो १२० रुपये,
गवार - प्रतिकिलो १२० रुपये
भेंडी - प्रतिकीलो १०० रुपये
सिमला मिरची - प्रति किलो१०० रुपये
कारले - प्रतिकिलो १०० रुपये
कोबी - प्रतिकिलो ६० रुपये,
दुधी भोपळा - प्रतिकिलो ६० रुपये,
वांगी - प्रतिकिलो ६० रुपये
कोथिंबीर - एक जुडी ४५ रुपये
मेथी, चवळी, पालक - एक जुडी ४० ते ५० रुपये
काकडी - प्रतिकिलो ४० रुपये,
बटाटा - प्रतिकिलो ४० रुपये किलो
कांदा - प्रतिकिलो ३० रुपये,
लिंबू - एक नग ५ रुपये
भोपळा - एक नग २०० ते ४०० रुपये
लसूण - प्रतिकिलो १०० रुपये
......................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.