पडद्यावर अश्रू, प्रत्यक्षात शांतता
मराठवाड्यात महापूर; मराठी कलाकारांच्या संवेदनशीलतेवर टीकेचा महापूर
नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : उभी पिके डोळ्यांसमोर वाहून गेली. कोठारातले धान्य कुजून वाया गेले. घरे आणि जनावरे पाण्यात गेली. आयुष्यभर घाम गाळून उभे केलेले स्वप्न क्षणात कोसळले. अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांचा हा आक्रोश ‘सकाळ’शी बोलताना उमटला. शेतकऱ्यांची ही वेदना संपूर्ण राज्य अनुभवत आहे; पण त्यांच्या संघर्षावर सिनेमे काढून लोकप्रिय झालेले मराठी कलाकार मात्र शांत आहेत. ‘आमच्यावर संकटाचे आभाळ कोसळल्यानंतर मदतीऐवजी कलाकार सेल्फ प्रमोशन करण्यात मग्न आहेत,’ असा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
ग्रामीण जीवनावरील आधारित कथानकांमुळे अनेक कलाकार, दिग्दर्शकांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. या भूमिका साकारून कलाकारांना स्टारडम मिळाले. पडद्यावर शेतकऱ्यांचे अश्रू दाखवून प्रेक्षकांची वाहवा मिळवणारी सिनेसृष्टी शेती खरडून निघाली मात्र शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी पुढे आली नाही. अभिनेता सोनू सूद याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे करण्याची घोषणा केली आहे. सोनूसारखे बोटावर मोजता येतील एवढे काही कलावंत सोडले तर बहुतांश मराठी कलाकारांना सोशल मीडियावर शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी दोन शब्द लिहायला वेळ मिळाला नाही. एकीकडे राज्यातील शेतकरी अतिवृष्टीने उद्ध्वस्त झाला असताना या काळात अनेक लोकप्रिय कलाकारांच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर शूटिंग लोकेशन्स, विदेश दौऱ्याचे फोटो, ब्रँड प्रमोशनच्या फोटोंचा महापूर आला आहे. त्यातच एका अभिनेत्रीने आयफोन १७ घेतल्याचे फोटो झळकावलेत, तर एकीने महाबळेश्वरमधील आनंददायी शांतता जगापुढे आणण्यात समाधान मिळवले आहे. यावर शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
पंजाबचे उदाहरण
पंजाबमध्ये भीषण पुरावेळी असंख्य पंजाबी कलाकार, गायकांनी आर्थिक मदत तर केलीच, पण पूरग्रस्तांच्या मदतीलाही थेट मैदानात उतरले. करण आहुजा, दिलजित दोसांज, ॲमी विर्क, सोनू सूद, हिंमाशी खुराना, अक्षय कुमार यांनी काही गावांच्या, कुटुंबांच्या पुनर्वसनाची जबाबदारी स्वीकारली. काही कलावंतांनी आपल्या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले. मराठी आणि पंजाबी कलाकारांमधील हा फरक सांगताना चित्रपट समीक्षक गिरीश वानखेडे म्हणाले, ‘पंजाबमधील कलाकार हे वैश्विक आहेत. संकटाच्या वेळी ते जगभरातून मदत मिळवतात. मराठी कलावंतांनी मात्र स्वतःला मराठीपुरते मर्यादित ठेवले आहे.’
आमच्या कथा विकून ते स्टार होतात, पण आम्ही अडचणीत आल्यावर दोन शब्दांची संवेदना दाखवली असती तरी आम्हाला आधार वाटला असता.
- संजय लक्ष्मण पवार, शेतकरी, परांडा, धाराशिव
..
आमच्या वेदना कुणाला दिसत नाहीत. आम्ही मराठी कलाकारांवर भरभरून प्रेम करतो, मात्र संकटाच्या वेळी त्यांना आमची आठवण येत नाही.
- यशवंत देवराम, शेतकरी, सिरसाव, धाराशिव
राज्यातील शेतकऱ्यांवर आलेल्या संकटात सर्व क्षेत्रांतील लोकांनी मदतीचा हात द्यायला हवा. प्रत्येकाने माणुसकी जपावी. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे.
- सयाजी शिंदे, अभिनेता
शेतकऱ्यांनी नाही केला पेरा तर शहरातील लोक काय खातील धतुरा? कलाकारांच्या ताटातील अन्नसुद्धा शेतकऱ्यांच्या घामातून येते; उद्योगपतींच्या घरातून हे अन्न मिळत नाही. म्हणूनच मराठी कलाकारांनी संवेदनशीलतेने पुढे येऊन शेतकऱ्यांना मदत करावी.
- रविकांत तुपकर, नेते, शेतकरी संघटना
पंजाबी कलावंतांचे आपल्या चाहत्यांशी वेगळी जवळीक, एक नाते आहे. मराठी कलाकारांनी ते नाते कधी विकसित केले नाही. ते आपल्याच जगात खूश असतात. त्यांच्यामध्ये एकतेचा मोठा अभाव आहे.
- गिरीश वानखेडे, चित्रपट समीक्षक
.
सोलापुरमधील पूरग्रस्तांना आर्थिक मदत देण्यासाठी एका विशेष कार्यक्रम करण्याचे नियोजन सुरू आहे.
- उत्कर्ष शिंदे, गायक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.