रायगडमध्ये पावसाचा तडाखा
तालुक्यातील शेतकरी हवालदिल; उत्पादन घटण्याची चिन्हे
रोहा, ता. १ (बातमीदार) : बिघडलेल्या निसर्गचक्राचा सर्वाधिक फटका सध्या शेती क्षेत्राला बसत असून, बळीराजा अक्षरशः हवालदिल झाला आहे. रोहा तालुक्यात या वर्षी रब्बी हंगामातच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. आता खरीप हंगामात हातातोंडाशी आलेले भातपीकही सततच्या पावसामुळे धोक्यात आले आहे.
मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सुरुवात झालेला पाऊस थांबायचे नाव घेत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. मेमध्ये पावसामुळे भातशेतीत ढोपरभर पाणी तुंबले होते. उभी पिके आडवी झाली, अनेक ठिकाणी शेती कापणीयोग्य राहिलीच नाही. या संकटावर मात करीत शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पुन्हा सज्जता दाखवली. सुरुवातीच्या पावसामुळे बियाणे पेरणीयोग्य झाली, रोपे वेळेत लावली गेली आणि शेतकरी समाधानी होता. पण काही दिवसांतच पुन्हा पावसाने जोर धरला. जुलैमध्ये दोन ते तीन वेळा पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊन अनेक शेती आठ-आठ दिवस पाण्याखाली राहिली. त्याच संकटाचा ऑगस्ट व सप्टेंबरमध्येही शेतकऱ्यांना सामना करावा लागला. भाताला फुल येऊन कणसाची वेळ सुरू झाली असताना, अतिवृष्टीमुळे पिकाची हानी होत आहे. त्यातच ठिकठिकाणी करपा रोगाने पिकांवर आक्रमण करून नुकसान वाढवले आहे. महागाई वाढलेली असताना शेतकरी तुटपुंज्या साधनसामग्रीवर कसोशीने शेती करतो, मात्र या हंगामात ऊन-पावसाच्या खेळामुळे शेतीचे पुरते नुकसान झाले आहे. रोहा तालुक्यातील शेतकरीवर्ग अक्षरशः निराश झाला आहे.
..................
लागवडीचे क्षेत्र घटले
सततच्या पावसामुळे रोहा तालुक्यातील शेती लागवडीचे क्षेत्र १० हजार हेक्टरवरून तब्बल सात हजार ३०० हेक्टरवर आले आहे. यामुळे उत्पादन घटण्याची चिन्हे स्पष्ट दिसत असून, तालुक्याच्या अन्न सुरक्षेलाही याचा फटका बसणार आहे. शेती क्षेत्रावर वारंवार येणाऱ्या संकटांमुळे उत्पादन घटले आहे. या हंगामात पावसाने उच्चांक गाठला. शेतकरीवर्ग हवालदिल आहे. पंचनामे करण्यात आले असून, शासन पातळीवर प्रबोधनाचे प्रयत्न सुरू आहेत, असे तालुका कृषी अधिकारी महादेव करे यांनी सांगितले. रायगड जिल्हा भाताचे कोठार म्हणून ओळखला जातो, पण दिवसेंदिवस शेतीवर संकटे वाढल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेतीकडे पाठ फिरवली आहे आणि उपजीविकेसाठी नवे मार्ग शोधल्याचे शेतकरी रामचंद्र बामणे यांनी सांगितले. या वर्षीच्या पावसाळ्यात शेतकरीवर्गाचे पुरते नुकसान झाले आहे. शासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने शेतकरीवर्गाला कोणीच वाली नसल्याचे राज्य शासनाचा कृषिनिष्ठ पुरस्कारप्राप्त शेतकरी नथुराम भोईर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.