हृदयरोगाच्या झटक्याने मृत्यूचे वाढतेय प्रमाण
ग्रामीण भागात तीन ते चार टक्के व्यक्तींना हृदयरोग; शहरी भागात अधिक धोका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ ः मुंबईसह राज्यात हृदयरोगाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. या सायलेंट किलरपासून रुग्णांचा बचाव व्हावा, यासाठी राज्य सरकारने पाच वर्षांपूर्वी स्टेमी हा प्रकल्प सुरू केला होता. गेल्या काही दशकांमध्ये हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या आजारामुळे मृत्यू आणि अपंगत्व लक्षणीय प्रमाणात वाढले आहे.
राज्य सरकारच्या २०१६च्या सरकारच्या आकडेवारीनुसार, हृदयरोगाच्या झटक्यामुळे मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण जास्त वाढले आहे. स्टेमी प्रकल्पाअंतर्गत राज्यात आतापर्यंत १३,२०३ व्यक्तींचा जीव वाचवण्यात आला आहे. वेळेवर आजाराची माहिती मिळाल्याने सुवर्णकाळात या रुग्णांवर सूचीबद्ध रुग्णालयांमध्ये मोफत उपचार करण्यात आले.
काय आहे स्टेमी?
राज्य आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात हृदयविकाराने मृत्यू होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. ज्यात ३० ते ४० वर्षांचा पुरुषांचा समावेश आहे. तर ४० ते ६० वर्षांच्या महिला याला बळी पडत आहेत. धमनी रोगाच्या कारणामुळे हृदयाचा झटका येण्याची शक्यता बळावते. त्यामुळे मोठ्या संख्येने व्यक्ती ग्रस्त आहेत. स्टेमी म्हणजे (स्टेमी एलिव्हेशन इन मायोकार्डियल इन्प्रक्शन) जो एक सामान्य प्रकाराचा हृदयरोग आहे, ज्यात हृदयाच्या कोणत्याही भाग रक्तपुरवठा होणे बंद होते. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने स्टेमी प्रकल्पाची पाच वर्षांपूर्वी २०२० जानेवारीमध्ये केली होती.
३४ जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात ३४ जिल्ह्यांमध्ये १,९०६ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या योजनांच्या विस्तारीकरणात हब अँड स्पोक मॉडेलचा समावेश केला गेला. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर, अर्ध्या तासाच्या आत औषधोपचार करून मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. तीव्र विकाराच्या झटक्याची चिन्हे ओळखण्यासाठी आणि लवकर उपचार घेण्यासाठी व जास्तीत जास्त लोकांमध्ये जागरुकता निर्माण केली जात आहे. राज्यातील ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, स्त्री रुग्णालये, जिल्हा व सामान्य रुग्णालये या शासकीय आरोग्यसंस्था तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र यांचा कार्यक्रमात समावेश केला आहे. निःशुल्क ईसीजी व क्लाउड तंत्रज्ञान सुविधेच्या मदतीने तज्ज्ञांमार्फत ईसीजी विश्लेषण सेवा दिली जाते.
हृदयरोग विकाराची मुख्य कारणे
उच्च रक्तदाब व मधुमेह, असंतुलित आहार,
तंबाखूचे सेवन, मद्यपान, मानसिक तणाव,
आनुवंशिकता, दैनंदिन जीवनशैली,
शारीरिक हालचालींचा अभाव
वर्ष ईसीजी परीक्षण स्टेमी
२०२०-२१ ३,४०२ ३०
२०२१-२२ १,०५,४७१ १,०१०
२०२२-२३ ३,३५,१२७ २,७८२
२०२३-२४ ३,९६,४४४ २,६४२
२०२४-२५ १०,७३,२३२ ६,०७७
(३० एप्रिल २०२५) १,४१,१९० ६६२
या पद्धतीने केले जाते निदान
हृदयरोगाच्या लक्षणांच्या रुग्णांना ईसीजी स्टेमी महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत स्पोक मॉडेलच्या रूपात सहभागी करून अपलोड केले जाते. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून हृदयरोग विशेतज्ज्ञ काही मिनिटात ईसीजीचे विश्लेषण आणि निदान करतात. सध्या हे ओळखण्यासाठी अवघे चार मिनिटे लागतात. स्पोक रुग्णालयात स्टेमी रुग्ण आल्यास त्याला तत्काळ थ्रोम्बोलिसिस उपचार दिले जातात आणि रुग्णाला पुढच्या उपचारांसाठी हब मॉडेलअंतर्गत रुग्णालयात रुग्णवाहिकेने पाठवले जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.