डहाणू तालुक्यात सरस्वती पाटी पूजन उत्साहात
कासा, ता. २ (बातमीदार) ः डहाणू तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा धरमपूर (बेलकरपाडा) येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर ज्ञानदेवता सरस्वती मातेच्या प्रतीक स्वरूपातील पाटी पूजन देखील पार पडले.
सरस्वती पाटी पूजन हा ज्ञान आणि कलेच्या देवीला अर्पण केलेला विधी असून, महाराष्ट्रात विशेषतः दसऱ्याच्या दिवशी याचे आयोजन केले जाते. डहाणू तालुक्यातील दुर्गम भागातील शाळांमध्ये पाटी पूजन परंपरेप्रमाणे करण्यात आले. पाटीचा वापर कमी झाला असला तरी शिक्षक व विद्यार्थी सरस्वतीचे चित्र काढून त्याची पूजा करून ही परंपरा जिवंत ठेवत आहेत. तर, धरमपूर बेलकरपाडा शाळेतही विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी एकत्रित येऊन गांधी जयंतीचे स्मरण केले, स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित केले आणि दसऱ्याच्या निमित्ताने पाटी पूजन करून परंपरेशी नाते दृढ केले. या उपक्रमामुळे मुलांमध्ये शिक्षणाबद्दल आदरभाव वाढतो आणि सांस्कृतिक परंपरा पुढील पिढीकडे पोहोचण्यास मदत होते, असा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला.