अटल उद्यानात घातक अफ्रीकन गोगलगायी
प्रादुर्भाव वाढल्याने झाडांची पाने, फांद्या फस्त
अंबरनाथ ता. २ (वार्ताहर) : शहरातील अटल उद्यान सध्या एका अदृश्य पण घातक शत्रूच्या विळख्यात सापडले आहे. उद्यानाच्या प्रत्येक कोपऱ्यात, झाडांच्या पानांवर, भिंतींवर आणि लोखंडी जाळ्यांवर शेकडो संख्येने पसरलेल्या अफ्रिकी गोगलगायींनी परिसराला अक्षरशः वेढा घातला आहे. जगातील सर्वात आक्रमक प्रजातींपैकी गणल्या जाणाऱ्या या गोगलगायी केवळ वनसंपदेवर कुरघोडी करीत नाहीत, तर मानवी आरोग्यासाठीही धोक्याची घंटा ठरत आहेत.
अंबरनाथ पूर्वेतील कानसई भागातील अटल उद्यानात गेल्या काही दिवसांत जायंट अफ्रीकन लॅंडस्नेल या घातक गोगलगायींचा प्रचंड प्रादुर्भाव झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. साधारण २० सेंटीमीटरपर्यंत वाढणाऱ्या या चॉकलेटी रंगाच्या शंखासारख्या गोगलगायींनी उद्यानातील हिरवळ, झाडांची पाने, फांद्या तसेच लोखंडी जाळ्या आणि भिंतींचे रंगसुद्धा फस्त केले आहेत. त्यांच्या मोठ्या संख्येमुळे उद्यानाचे नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यावरणीय संतुलन धोक्यात आले आहे.
उद्यानात नियमित फेरफटका मारणारे स्थानिक नागरिक संजय अदक यांनी सांगितले, की गेल्या काही दिवसांत या गोगलगायींची संख्या झपाट्याने वाढली आहे. झाडांची पाने ते लोखंडी जाळे, सगळीकडे त्यांचा पसारा आहे. उद्यानाच्या शेजारीच एक शाळा असून, शाळा सुटल्यावर अनेक मुले या गोगलगायींशी खेळताना दिसतात. त्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
प्राणीशास्त्र विभागाचे अभ्यासक आणि शिवळे महाविद्यालयातील प्राध्यापक अनिकेत मराठे यांनी यासंदर्भात इशारा दिला आहे. त्यांचे म्हणणे आहे, की या गोगलगायी नर्सरीतील झाडांमधून पसरतात. दमट हवामान आणि हिरवाई यामुळे त्यांची वाढ प्रचंड वेगाने होते. कुजलेला पालापाचोळा, झाडांची साल, हिरवा पाला ते लोखंडी वस्तूंचे पापुद्रे हे सर्व त्यांचे खाद्य आहे. त्यावर नियंत्रण न मिळवल्यास संपूर्ण जैविक साखळीवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. विशेष म्हणजे या गोगलगायींचा आरोग्यावरही गंभीर परिणाम होऊ शकतो. मानवी मेंदूच्या आजारांशी संबंधित परजीवींच्या प्रसारात ही प्रजाती वाहक ठरते. उघड्या हातांनी गोगलगायींना स्पर्श केल्यास संसर्ग होण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे स्पष्ट मत आहे. याशिवाय त्यांची विष्ठा मोठ्या प्रमाणावर उद्यानात पसरलेली दिसते, ज्यामुळे संपूर्ण वातावरण अस्वच्छ आणि धोकादायक झाले आहे.
वनसंपदा धोक्यात
प्रजातीची ओळख तिच्या मोठ्या आकारावरून सहज करता येते. चॉकलेटी रंग, शंखावर पट्टे आणि त्याच्या जवळच पडलेली विष्ठा. सध्या अटल उद्यानात या गोगलगायींनी इतका वेढा घातला आहे, की त्यावर तातडीने कारवाई न केल्यास त्यांचा प्रसार शहरातील इतर हिरवळीतही होऊ शकतो. अंबरनाथमधील या अफ्रीकी गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे एकीकडे वनसंपदा धोक्यात आली आहे, तर दुसरीकडे नागरिकांच्या आरोग्यासही मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन, वन विभाग आणि आरोग्य विभागाने एकत्र येऊन तातडीने नियंत्रण मोहीम हाती घेणे ही काळाची गरज आहे.
आम्ही उद्यानात फेरफटका मारत असताना ही नेहमीपेक्षा वेगळी गोगलगाय निदर्शनास आली. या गोगलगायीचा रंग लाल तपकिरी असल्याने त्याच्याविषयी धक्कादायक माहिती समोर आली. ही गाय विषारी व तिचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे समजताच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उद्यानाच्या स्वच्छतेसंदर्भात नगरपालिकेशी चर्चा केली. दरम्यान, या उद्यानाच्या नूतनीकरणासाठी गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्न सुरू असून, लवकरच उद्यानाचे काम मार्गी लागेल.
- संजय अदक, स्थानिक नागरिक