परम वैभवम् नेतूमेतत् स्वराष्ट्रम
संघ शताब्दी विजयादशमी उत्सव उत्साहात
नागपूर, ता. २ ः संघ शताब्दीनिमित्त आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव अत्यंत उत्साहात साजरा झाला. उगवत्या सूर्याच्या साक्षीने रेशीमबागेतील स्मृती मंदिर परिसरात गणवेशातील हजारो स्वयंसेवक एकत्र येत होते. चैतन्य, उत्साहाने वातावरण भारलेले होते. येथील धावपळीलाही शिस्त होती. ध्वनिक्षेपकावरून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे तंतोतंत पालन करीत स्वयंसेवक आपापल्या स्थानी जात होते.
घाट रोडपासूनच पोलिस बंदोबस्त होता. पोलिसांबरोबर व्यवस्थेतील संघ स्वयंसेवकही गर्दी नियंत्रित करण्यासाठी मदत करीत होते. पार्किंग व्यवस्थेचे नियोजन चोख असल्याने कुठेही गोंधळ गडबड नव्हती. कार्यक्रम परिसरात सारी व्यवस्था संघ स्वयंसेवक सांभाळत होते. निमंत्रितांना त्यांच्या स्थानी स्थानापन्न करणे, पाण्याच्या बाटल्या पुरवणे, कचरा उचलणे आदी सारी कामे स्वयंसेवक हसतमुखाने करीत होते. सात वाजून ३९ मिनिटे आणि ६० सेकंदाने सरसंघचालक डाॅ. मोहन भागवतांचे अतिथींसह आगमन झाले. शस्त्रपूजनानंतर मान्यवरांंनी व्यासपीठावर स्थान ग्रहण केले. व्यासपीठावर सरसंघचालक डाॅ. मोहन भागवत, प्रमुख अतिथी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार, विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगे, महानगर संघचालक राजेश लोया उपस्थित होते. स्वागत प्रणाम, स्वागत धून वाजल्यानंतर हजारो स्वयंसेवक व उपस्थितांच्या साक्षीने, घोषाच्या नादमयी सुरावटींसह केसरिया ध्वज निळ्या आकाशात फडकला. त्या वेळी सूर्याच्या सोनेरी किरणांनी सारा परिसर तेजोमय झाला होता. योगासने, घोष वादनानंतर हजारो कंठातून ‘वयं सर्वे सहोदरा’ हे सांघिक गीत सादर झाले तेव्हा उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले.
संघ शताब्दी वर्षाचा आजचा उत्सव कृतज्ञ स्मरणाचा व दृढ संकल्पाचा असल्याचे महानगर संघचालक राजेश लोया यांनी प्रास्ताविकातून सांगितले. स्वयंसेवकांचे जीवन देशहितासाठी समर्पित असावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. राजेश लोया यांनी प्रमुख अतिथी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा परिचय करून दिला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शताब्दी वर्षानिमित्त शुभेच्छा देत संघाच्या कार्याचा गौरव करणाऱ्या दलाई लामांच्या संदेशाचे वाचन श्रीधर गाडगे यांनी केले. ‘विराट हिंदू राष्ट्र के संघ चरण चल रहे, संघ चरण बढ रहे’ हे गीत संघ स्वयंसेवकाने सादर केले.
...
क्षणचित्रे
- संघ प्रार्थनेच्या वेळी रामनाथ कोविंद यांनीही प्रणाम स्थितीत प्रार्थना म्हटली.
- कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे संपूर्ण संघ गणवेषात उपस्थित होते. ध्वनिक्षेपकावरून संघ स्वयंसेवकांना दिल्या जाणाऱ्या सर्व आज्ञांचे पालन हे तिघेही करताना दिसले. तिघांनीही संघ प्रार्थना प्रमणाम स्थितीत म्हटली.
- पत्रकार कक्षामध्ये विदेशी पत्रकार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रम ऐकण्यासाठी त्यांना ट्रान्सलेटर देण्यात आले होते.
- घोष वादन व संघ स्वयंसेवकांच्या शिस्तबद्ध कवायतींना उपस्थितांकडून दाद दिली जात होती.
- रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या भाषणाचा शेवट ‘भारत माता की जय’ने केला.
- व्यासपीठावर बॅकड्रापवर ‘संघ चरण बढ रहे...’ या ओळी लिहिलेल्या होत्या.
- शस्त्रपूजनाच्या ठिकाणी ‘शस्त्रे रक्षिते राष्ट्र, शास्त्र चिंता प्रवर्तते’ या ओळी लिहिलेल्या होत्या.
- डाॅ. भागवत यांनी सुरुवातीला गुरू तेगबहादूर, महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन केले.
...
उपस्थित विशेष पाहुणे
लेफ्टनंट जनरल रामाप्रताप, संजीव बजाज, के. व्ही. कार्तिक, स्वामी शंकरानंद गिरी, दक्षिण आफ्रिकेतील घाना देशाचे माजी आरोग्यमंत्री डाॅ. झ्वेली मिखेजे, दक्षिण आफ्रिकेचे व्यावसायिक नोमोंडो माकोन्गो, भीष्म रन्सी ब्रह्मांकुल, थाई राजघराण्याचे राॅयल ब्राह्मण प्रो. सोफना श्रीचंपा यांच्यासह बाली, अमेरिका येथील वरिष्ठांची कार्यक्रमाला उपस्थिती होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.