तारापूर, ता. २ (बातमीदार) : आकर्षक परताव्याचे प्रलोभन दाखवत आदिवासी महिलांकडून दोन कोटींपेक्षा अधिकची रक्कम जमा करून त्याचा परतावा न देता आर्थिक फसवणूक करणाऱ्या पती-पत्नीसह एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने तपास पालघर येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी रुपेश पाटील याला पोलिसांनी गुजरातमधून अटक केली, तर अन्य पाच जण अजूनही फरार आहेत.
पालघर तालुक्यातील बहाडोली येथील रुपेश पाटील आणि त्याची पत्नी कल्पना यांनी मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गात संपादित जमिनीचा मोबदला मिळालेल्या धुकटण परिसरातील गरीब आदिवासी महिलांना गुंतवलेल्या रकमेवर वार्षिक १६ टक्के व्याज देण्याचे प्रलोभन दाखवत दोन कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा केली होती. ही रक्कम त्यांनी गुजरात राज्यातील क्रेडिट सोसायटीमध्ये गुंतवली होती. मुदत पूर्ण झाल्यानंतरदेखील गुंतवलेली मूळ रक्कम आणि त्यावरील व्याज परत न भेटल्याने महिलांनी पती-पत्नीकडे आपले पैसे मागण्यास सुरुवात केली; मात्र मुदत पूर्ण झाल्यानंतरदेखील गुंतवलेले पैसे परत न मिळाल्याने आर्थिक फसवणूक करण्याची लक्षात येताच महिलांनी दाम्पत्याविरोधात मनोर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणाचा तपास पालघर येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. गुन्हा दाखल होताच सर्व संशयित फरार झाले होते. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनीता आथने, उपनिरीक्षक धनराज शिरसाठ, हवालदार कैलास बोंड यांच्या पथकाने दोन महिन्यांपासून फरार असलेल्यांपैकी रुपेश पाटील याला रविवारी (ता. २८) गुजरातमधील वापी येथून ताब्यात घेत अटक केली आहे. त्याला पालघर येथील न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.