जे.जे. डी-नोव्हाच्या कुलगुरूपदी प्रो. हिम चटर्जी?
उच्च तंत्रशिक्षण विभागाकडून लवकरच घोषणा
संजीव भागवत ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ ः राज्य कला संचालनालयाच्या अंतर्गत असलेल्या जे.जे.मधील वास्तूकला, फाईन आणि कमर्शिअल आर्टची महाविद्यालयांच्या एकत्रीकरणातून ‘सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड डिझाइन’ (अभिमत स्तरावरील डी-नोव्हो विद्यापीठ) या विद्यापीठाच्या कुलगुरूपदांच्या नियुक्तीचा तिढा सुटला आहे. या विद्यापीठाच्या नवीन कुलगुरूपदी जगभरात नावलौकिक असलेले ज्येष्ठ शिल्पकार व चित्रकार प्रो. हिम चटर्जी यांची निवड झाली असून त्यासाठीची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे मंत्रालयातील अधिकारी सूत्रांकडून सांगण्यात आले.
डी-नोव्हो विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून डॉ. रजनीश कामत यांनी दीड वर्षांहून अधिक पदाचा कार्यभार सांभाळून यूजीसीने मान्यता दिलेले नवीन अभ्यासक्रम सुरू केले. या विद्यापीठातील अभ्यासक्रमांसाठी सर्वसामान्यांना परवडेल, अशा शुल्क रचनेचा सर्वात महत्त्वाचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली, या पहिल्याच विद्यापीठाचे प्रशासकीय कामकाज सुरळीत करून रुळावर आणले. तज्ज्ञांच्या साहाय्याने अत्यंत प्रगत अभ्यासक्रम, त्यांची रचना केली. तसेच पहिल्यांदाच येथील अमूल्य अशा चित्र, शिल्पांसाठी संग्रहालय व्हावे, यासाठी त्यांनी प्रयत्न करून विद्यापीठाची एक वेगळी ओळखही निर्माण केली, यातून या विद्यापीठाचा नावलौकिक केला. आता डॉ. कामत यांनी निर्माण केलेला वारसा या विद्यापीठाला शिमला येथील प्रो. हिम चटर्जी हे कुलगुरू म्हणून चालवणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, डी-नोव्हो विद्यापीठाच्या नवीन कुलगुरूंच्या या घोषणेपूर्वी कुलगुरूपदासाठी पात्रता नसलेल्या आणि या पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या माजी संचालकांसह राज्यातील अनेकांमध्ये अस्वस्थता पसरली असल्याने यासाठी कला क्षेत्रातील तज्ज्ञांमध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. काहींनी प्रभारी संचालकांप्रमाणचे नवीन कुलगुरूंची नियुक्ती होऊ नये, यासाठी प्रभारी कारभार आपल्याकडेच यावा आणि हे पद आपल्यालाच मिळावे, म्हणून मंत्रालयापासून ते दिल्लीपर्यंत आपले वजन वापरले होते.
३० जण होते शर्यतीत
डी-नोव्हो विद्यापीठाच्या नियमावलीनुसार या विद्यापीठाच्या कुलगुरूंची नियुक्ती ही राज्यपालांऐवजी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून करण्याची तरतूद आहे. यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून नियुक्तिपदासाठी प्रक्रिया सुरू आहे. सुमारे ३० जणांचे यासाठी अर्ज आले होते, त्यासाठी झालेल्या पडताळणीत सात उमेदवारासमोर आले होते. त्यापैकी दोन उमेदवारांची यादी अंतिम करण्यात आली असून यापैकी अंतिम नाव प्रो. चटर्जी यांचे करण्यात मंत्रालयातील अधिकारी सूत्रांकडून सांगण्यात आले.
दोन माजी संचालकांचे अर्ज बाद
डी-नोव्हो विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी पात्रता नसताही जे.जे. कला संचालनालयाच्या एका माजी संचालकांनी तसेच संचालकपदासाठी लोकसेवा आयोगाने नाकारलेल्या काहींनी अर्ज केले होते; त्यांचे अर्ज पडताळणीमध्ये यासाठी असलेल्या समितीकडून बाद करण्यात आले असल्याचेही अधिकारी सूत्रांकडून सांगण्यात आले.
या नावांचीही चर्चा!
‘जेएनयू’तील विजय किशोर, जयपूर येथील ‘एमआयटी’च्या मधुरा यादव, नोएडा अमेटी येथील जोशी, मुंबईतील जे.जे. कला संचालनालयातील विलास रामटेके, भोपाळ येथील ‘एसपीआय’चे संजय सिंग यांच्या नावांची कुलगुरूपदासाठी अंतिम यादीत चर्चा होती. यात शिमला येथील व्हिज्युअल आर्ट हिमाचल विद्यापीठातील वरिष्ठ प्रो. हिम चॅटर्जी यांनी बाजी मारली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.