पालघर, ता. २ (बातमीदार) : मुरबे या गावात बंदर प्रस्तावित असून, त्यांची जनसुनावणी पालघर येथे ६ ऑक्टोबर रोजी ठेवण्यात आली आहे. ही जनसुनावणी होत असताना कुठलेही प्रकारे सरकार उद्योग अथवा बंदर विभागाने किमान बाधित होत असणाऱ्या गावांना विश्वासात घेण्याचे सौजन्य दाखवले नाही. त्यामुळे ग्रामस्थांसह परिसरात संतापाची लाट आहे. याच अनुषंगाने जोपर्यंत सरकार पुढाकार घेऊन किमान बाधित होणाऱ्या गावांबाबत सरकारचे उद्योगाबात धोरण काय आहे व नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली जात नाही, तोपर्यंत जनसुनावणी घेऊ नये, अशी आग्रही मागणी व भूमिका पंचक्रोशीतील सरपंच, लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकारी डॉ. जाखड यांना भेटून निवेदन दिले. सरकार, तसेच संबंधित विभागाला कळवले जाईल, अशी भूमिका जिल्हाधिकारी जाखड यांनी मांडली. या वेळी कुंदन संखे, वैभव संखे, उमरोळी सरपंच प्रभाकर पाटील, कुंभवली सरपंच तृप्ती संखे, पंचाळी गावचे रवींद्र पाटील, उपसरपंच मिनेश पाटील, कोळगाव सरपंच कुणाल पाटील, दापोली सरपंच हेमंत संखे, कोलवडे सरपंच कुंजल संखे, उपसरपंच आकाश संखे, उमरोळी गावचे अनिल तरे, माजी उपसरपंच अमित संखे, भौतेश पाटील, सुमित पिंपळे, राहुल संखे यांसह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.