श्रीकांत खाडे : सकाळ वृत्तसेवा
अंबरनाथ, ता. २ : अंबरनाथ नगरपालिकेचे नाट्यगृह सुरू होणार असल्याने प्रयोग पाहण्याची संधी आता अंबरनाथमध्येच मिळणार आहे. नियोजित नाट्यगृहासमोरील जुन्या भिंतीवर नाट्यपरंपरा दर्शवणाऱ्या विविध रंगछटा चित्रकाराने कुंचल्याच्या साह्याने रेखाटल्या आहेत; मात्र त्या कलेची योग्य निगा न राखल्याने नाट्यगृह सुरू होण्यापूर्वी भिंतीवरील चित्रे शेवाळे, वेली आणि झुडपांमध्ये गडप झाल्याचे दृश्य पाहावयास मिळत आहे.
अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने पश्चिमेला रेल्वेस्थानक परिसरात सर्कस ग्राउंडवर अंदाजे ४० कोटी रुपये खर्च करून नाट्यगृहाच्या निर्मितीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या वर्षअखेरीला उद्घाटन होण्याची शक्यता आहे. प्रशस्त नाट्यगृहाच्या समोरील दर्शनी भागात एका बंद कंपनीच्या भिंतीवर तत्कालीन प्रशासक डॉ. प्रशांत रसाळ यांच्या संकल्पनेतून चित्रकार मोहन जगतात यांनी नाट्यपरंपरेला साजेश्या अशा अनेक कलाकृती जुन्या आणि ओबड-धोबड भिंतींवर रेखाटल्या होत्या. मात्र, सध्या पावसामुळे जगताप यांच्या मेहनतीवर पाणी फेरल्याचे दिसून येत आहे. रेखाटलेल्या भिंतीवर लहान लहान झुडपे, वेली, झाडांच्या फांद्यामुळे चित्रे झाकोळून टाकली आहेत. रस्ता सिमेंट काँक्रीटचा पण रस्त्याच्या कडेला नाला नसल्याने पाणी वाहून जायची सोय नाही. त्यामुळे पावसाचे पाणी साचले आहे. पावसाचे पाणी भिंतीवर उडून भिंत खराब झालेल्या दिसतात.
पावसाचे जास्त प्रमाण आणि भिंती जुन्या असल्याने पाणी गळतीचे प्रमाण जास्त असावे. त्यावेळी काढलेल्या रंगछटा मात्र सुस्थितीत आहेत, असे चित्रकार मोहन जगताप म्हणाले. पालिकेच्या मालकीची उद्याने, प्रशासकीय इमारती, नाट्यगृहे मालकीच्या वास्तूंची योग्य निगा ठेवावी, असे आवाहन तत्कालीन मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी अंबरनाथहून अन्यत्र बदली झाल्यानंतर निरोप समारंभात अधिकाऱ्यांना सांगितले होते. त्याचे विस्मरण झाल्याचे संबंधित भिंतीच्या अवस्थेवरून लक्षात येते. पावसामुळे चित्रे रेखाटलेल्या भिंती आणि परिसर स्वच्छ करण्याकडे त्वरित लक्ष देऊ, असे नगरपालिका उपमुख्याधिकारी उमेश राऊत आणि आरोग्याधिकारी केदार शिंदे यांनी सांगितले.
हुबेहूब कलाकृती
अंबरनाथ शहरातील नाट्य, शाहिरी, सांस्कृतिक परंपरेला अनुसरून नटराज मूर्ती, बालगंधर्वांपासून राम गणेश गडकरी, पु. ल. देशपांडे, लोकशाहीरांची परंपरा, पोतराज, गोंधळी, त्याचबरोबर धार्मिक आदी विविध प्रकारची आकर्षक हुबेहूब कलाकृती जगताप यांनी त्यांच्या कुंचल्याच्या साह्याने रेखाटल्या होत्या. त्यामुळे परिसराला आकर्षक रूप प्राप्त झाले होते.
नाट्यगृहाचे लोकार्पण लांबणीवर
वास्तविक मेमध्ये नाट्यगृहाचे उद्घाटन होण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू होत्या. मात्र, काही कामे शिल्लक असल्याने नाट्यगृहाचे ते लांबणीवर पडले. काही तांत्रिक कामे करणे बाकी असल्याने नाट्यगृहाचे लोकार्पण लांबणीवर पडले.
गांधी जयंतीनिमित्त परिसर स्वच्छ
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अंबरनाथ शहरात मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत नाट्यगृहासमोरील आकर्षक रंगवलेल्या भिंती आणि परिसर स्वच्छ करण्यात आला. उपमुख्याधिकारी उमेश राऊत, आरोग्य खातेप्रमुख राजेश शिंदे आणि अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.