पात्रता नसताना उपायुक्तपदी बसवून ठाणेकरांची नाचक्की
काँग्रेस प्रवक्ते राहुल पिंगळे यांचा आरोप
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : पात्रता नसलेल्या आणि भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांना सामोरे जाणाऱ्या शंकर पाटोळे यांना ठाणे महापालिकेत उपायुक्तपदी बसवणे म्हणजे ठाणेकरांसोबत विश्वासघात आहे. आयुक्तांनी राजकीय दबावाखाली घेतलेला हा निर्णय महापालिकेच्या प्रतिमेवर काळा डाग लावल्याचा आरोप ठाणे शहर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी केला.
काँग्रेसच्या खुलाशानुसार, २००४मध्ये उप समाजविकास अधिकारी म्हणून लागलेले शंकर पाटोळे २०१०मध्ये समाजविकास अधिकारी झाले. त्यानंतर सहाय्यक आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार म्हणून संवेदनशील प्रभाग समित्यांमध्ये काम करीत त्यांनी पूर्णवेळ सहाय्यक आयुक्त पदाच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा केला. सहाय्यक आयुक्त पदावरील नियुक्तीस मान्यता मिळण्याबाबतच्या पालिका पत्राच्या अनुषंगाने सरकारने माहिती सादर करण्यास सांगितले. प्रस्तावात नमूद केलेल्या अधिकाऱ्याची विभागीय चौकशी चालू अथवा प्रस्तावित नसल्याचा प्रथम अहवाल महापालिकेने दिला आणि याबाबतच्या दुसऱ्या अहवालात मात्र शंकर पाटोळे यांच्याबाबत बीएसयूपी अनियमितता, अँटिकरप्शन ब्युरोतील तक्रार, अनधिकृत बांधकामांना दिलेले संरक्षण आणि नागरिकांकडून आलेल्या तक्रारी प्रलंबित असल्याबाबत सादर केले. परंतु सरकारने आजवर पाटोळे यांच्या सहाय्यक आयुक्त पदालाच मान्यता दिलेली नाही, हे धक्कादायक वास्तव असून, अशा स्थितीत त्यांची पदोन्नती ही पूर्णपणे बोगस व बेकायदा असल्याचा काँग्रेसचा दावा आहे. याचबरोबर पाटोळे यांची २०१८ ते २०२१ कालावधीत झालेल्या अनधिकृत बांधकामाबाबत चौकशी चालू असताना व सहाय्यक आयुक्त पदाची शासन मान्यता नसताना उपायुक्तपदी नेमल्याने महापालिकेच्या कारभारातील भ्रष्टाचार उघड झाल्याचे पिंगळे म्हणाले.
दरम्यान, आम्ही अनेकदा पुराव्यानिशी आयुक्तांकडे तक्रारी दाखल केल्या. तत्कालीन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीसुद्धा या अधिकाऱ्याची कारकीर्द भ्रष्टाचाराने बरबटलेली असल्याचे लेखी पत्राद्वारे स्पष्ट केले. तरीही या अधिकाऱ्याला राजकीय आशीर्वादाने अभय देण्यात आले. ठाणेकरांची ही थेट फसवणूक आहे, असा थेट आरोप काँग्रेसने केला.
इतर विभागांतील भ्रष्टाचार जनतेसमोर आणणार
आम्ही आता सार्वजनिक बांधकाम, स्थावर मालमत्ता, घनकचरा व शहर विकास विभागातील भ्रष्टाचाराचे पुरावे जनतेसमोर आणणार आहोत. आयुक्तांनी राजकीय दबावाला बळी न पडता कारवाईची भूमिका घेतली नाही, तर काँग्रेस रस्त्यावर उतरून ठाणेकरांसाठी लढेल, असा इशारादेखील पिंगळे यांनी या वेळी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.