आतकोली क्षेपणभूमी बहरली
कचऱ्याची पर्यावरणपूरक विल्हेवाट
ठाणे महापालिकेचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : क्षेपणभूमी म्हटले म्हणजे डोळ्यासमोर कचऱ्याचे डोंगर उभे राहतात. दुर्गंधीने हात आपसूक नाकावर जातो. भिवंडीच्या आतकोली येथील क्षेपणभूमी मात्र हिरवाईने नटली आहे. अवघ्या आठ महिन्यांत उभ्या राहिलेल्या ४० फूट कचऱ्याच्या डोंगराचे सपाटीकरण करून ठाणे महापालिकेने त्यावर लॉन उभारले आहे. चोहोबाजूने हिरवळ, शेकडो कडुलिंबाची रोपे आणि बांबूच्या वनाच्या संरक्षक भिंतीमुळे भिवंडीच्या आतकोलीला उद्यानाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
दिवा येथील डम्पिंग ग्राउंड बंद झाल्यानंतर राज्य शासनाने ठाण्यातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ठाणे महापालिकेला भिवंडीच्या आतकोली येथे ३४ हेक्टर इतका भूखंड दिला आहे.
ठाणे शहरात रोज जमा होणारा सुमारे एक हजार टन कचरा या क्षेपणभूमीवर गेल्या आठ महिन्यांपासून टाकला जात आहे. या कालावधीमध्ये १० गुंठे भूखंडावर तब्बल ४० फुटांचा कचऱ्याचा डोंगर उभा राहिला. सुमारे ६० हजार टन इतक्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरू लागली. त्यामुळे येथील गावकऱ्यांचा विरोधही वाढला. अखेर यावर ठाणे महापालिकेने पर्यावरणपूरक तोडगा काढला आहे. गौणखनिजाचे उत्खनन झाल्यामुळे ओसाड झालेल्या या भूखंडावर कचऱ्यातून हिरवाई फुलवण्याचा ध्यास पालिकेच्या घनकचरा विभागाने घेतला आहे.
पालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार येथील १० गुंठे भूखंडावर प्रायोगिक तत्त्वावर ही संकल्पना राबवण्यात येत आहे. यासाठी येथे टाकलेल्या कचऱ्यावर सर्वप्रथम लाल मातीचा थर देण्यात आला आहे. दुर्गंधीनाशक तसेच जंतूनाशक रसायनाची फवारणी करीत माती व कचऱ्याचे मिश्रण करून मग त्यावर हिरवळ तयार करण्यात आली आहे. अशा पद्धतीने तयार झालेल्या लॉनमुळे या परिसराचे रुपडे पालटले आहे. विशेष म्हणजे कचऱ्याचे रूपांतर खतमिश्रित मातीत होईल, अशा पद्धतीने ही प्रक्रिया राबवण्यात आली आहे. त्यामुळे कचऱ्याचे पर्यावरणपूरक विघटन होणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर प्रत्येकी १० गुंठे याप्रमाणे ३६० लॉन तयार करणे शक्य होणार आहे. याशिवाय या परिसरात ११० कडुलिंबाची रोपटी लावण्यात आली आहेत.
ऑक्सिजन मिळणार
भूखंडावर असलेल्या जुन्या झाडांचे संवर्धन केले जात आहे. याशिवाय कडुलिंबाची रोपटी लावण्यात येत आहेत. तसेच बांबूच्या बनाची संरक्षक भिंतही उभारण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात क्षेपणभूमी परिसराला भरपूर ऑक्सीजन मिळणार आहे.
सुगंधी फुलांचा दरवळ
आतकोली भूखंडावर उच्च दाबाचे विद्युत पोल आहेत. या पोलची रचना पिरामिडसारखी करण्याची योजना आहे. तसेच त्याभोवती सुगंधी फुलांची रोपटी लावण्यात येणार आहेत. देशभरातील सर्व जातींच्या सुगंधी फुलांची रोपटी येथे लावून उद्यान तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे कचऱ्याची दुर्गंधी कमी होण्यास मदत होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.