बोळिंज, ता. ५ (बातमीदार) ः खानावळीच्या पैशांतून झालेल्या वादात सहकाऱ्याचा खून करून पळून गेलेल्या कर्मचाऱ्याला गुजरात येथील जहाजातून अटक करण्यात आली आहे. नायगाव गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कामगिरी केली आहे.
कामण येथील सेनरजी हायजील कंपनीत दिलीप सरोज आणि सुनील प्रजापती हे काम करीत होते. या दोघांच्या खानावळीचे पैसे मालक प्रकाश चामरिया यांनी सुनीलच्या बँक खात्यात वळते केले होते; मात्र प्रजापतीने सरोजला त्याची रक्कम दिली नाही. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. त्या वेळी प्रजापतीने सरोजवर प्राणघातक हल्ला केला. त्यात सरोजच्या डोक्याला, दोन्ही डोळ्यांवर आणि उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी नायगाव पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता; मात्र उपचार सुरू असताना सरोजचा मृत्यू झाला. याप्रकरणी खुनाचे कलम वाढवण्यात आले. त्यानंतर संशयित प्रजापती फरार झाला होता.
२०० हून अधिक जहाजांची तपासणी
गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी आणि अंमलदार यांची दोन वेगवेगळी पथके बनवून प्रजापतीचा शोध घेतला जात होता. तपासादरम्यान तो ओका येथील द्वारका बंदरात जहाजात लपून राहत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेने ओका बंदरालगत असलेली २०० हून अधिक जहाजांची तपासणी करून सुनीलला अटक केली.