मुंबई

औद्यागिक विकासात अडथळे

CD

औद्यागिक विकासात अडथळे
वीज, पाणी, रस्ते, कोंडीची समस्या : उद्योजकांनी वाचला पाढा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करताना ठाणे जिल्ह्यातील उद्योगाकडे अपेक्षेने पाहिले जात आहे; मात्र आजही वांरवार खंडित होणारा वीजपुरवठा, पाणीटंचाई, रस्ते आणि कोंंडी अशा समस्यांना येथील उद्योगांना तोंड द्यावे लागत आहे. या समस्यांचा पाढा वाचत पायाभूत सुविधांचे जाळे उभारण्यास प्राधान्य द्यावे, अशी मागणी जिल्ह्यातील उद्योजकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात चार दिवसांपूर्वी विविध बैठकांचे आयोजन केले होते. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक सोनाली देवरे, महावितरणचे अधीक्षक अभियंता विजय फुंदे यांच्यासह विविध औद्योगिक कंपन्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी उपस्थित औद्योगिक कंपन्या, संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना ठाणे जिल्ह्यातील उद्योगांसाठी असलेल्या सकारात्मक बाबींचा उल्लेख केला. तसेच त्यांना उद्योगवाढीसाठी अपेक्षित घटकांबाबत चर्चा करून समस्या जाणून घेतल्या. ठाणे जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटनांनी या वेळी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी प्रशासनाकडे महत्त्वाच्या मागण्या सादर केल्या. तसेच काही उपायही सुचवण्यात आले.

मुरबाड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनने वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याकडे या वेळी लक्ष वेधले. जुन्या आणि कमकुवत व्यवस्थेमुळे मुरबाडमध्ये दररोज वीजपुरवठा खंडित असून, पूर्ववत होण्यास बराच वेळ लागतो. त्याचा परिणाम उत्पादनावर होत असल्याचे या वेळी सांगण्यात आले. एकतर खासगी कंपनीला वीजपुरवठा करण्यासाठी परवानगी द्यावी किंवा वाहिन्या भूमिगत कराव्यात अशी मागणी करण्यात आली. एमआयडीसीमधील सर्व रस्त्यांची दुरुस्ती करून ते रुंद आणि आरसीसी करण्याची सूचना करण्यात आली. तसेच वाढत्या औद्योगिक आणि निर्यात उपक्रमांमुळे कंटेनर ट्रक रस्त्यांवर उभे राहतात. ज्यामुळे वाहतूक कोंडी होते. या समस्येवर तोडगा म्हणून एमआयडीसी क्षेत्रात एक स्वतंत्र ट्रक टर्मिनस तयार करण्याची मागणी केली आहे.

अंबरनाथमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव एमआयडीसीने भूखंड वाटप करताना अनेक ठिकाणी योग्य पायाभूत सुविधा दिल्या नसल्याचे आमाने निदर्शनास आणून दिले. अजूनही अंतर्गत रस्ते आणि वादळी पाण्याचा निचरा करणारी गटार व्यवस्था अपूर्ण आहे. गेल्या एक वर्षापासून नियमितपणे एक ते दोन तासांसाठी वीज खंडित होत असल्याने उद्योगांचे मोठे नुकसान होत आहे. कटाई नाका ते बदलापूर एमआयडीसीपर्यंतच्या रस्त्याचे काम योग्य न झाल्याने कोंडीचा त्रास सहन करावा लागत असल्याची कैफियत या वेळी मांडण्यात आली.

टीसासमोर पाणी, कचऱ्याचा प्रश्न
ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन म्हणजेच टीसानेही या वेळी पाणी व कचरा डेपोकडे लक्ष वेधले. पाण्याचा शटडाऊन घेताना आगाऊ सूचना दिली जात नाही. अचानक पाणीकपात केली जात असल्यामुळे नुकसान सहन करावे लागते, असे या वेळी सांगण्यात आले. तसेच वागळे इस्टेटमधील रस्ता क्र. २६ वर कचरा टाकण्यास त्वरित आळा घालावा. यामुळे कामगारांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असून, परदेशी पाहुण्यांसमोर उद्योगांची प्रतिमा खराब होत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली. याशिवाय एपीएफओ कार्यालयात येणाऱ्या अडचणींकडेही लक्ष वेधण्यात आले.

शहापूरच्या उद्योगांना टँकरचा आधार
शहापूर इंडस्ट्रियल असोसिएशननेही खंडित वीजपुरवठ्याची समस्या मांडली. विशेष म्हणजे तानसा आणि भातसा धरणातून पाणी मिळूनही उद्योगांसाठी पिण्याच्या पाण्याची जलवाहीनी नसल्याने टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याचे सांगितले. शहापूर तालुक्यात सुमारे २५०० ते ३००० उद्योग असून, येथे पूर्ण क्षमतेचे अग्निशमन केंद्र तातडीने उभारण्याची मागणी करण्यात आली.

Success Story : जळगाव रेल्वे स्टेशनवर सापडलेली माला झाली 'महसूल सहायक', नोकरीच्या पहिल्याच दिवशी मिळणार अनोखी भेट

Nagpur News: महिला पोलिसांच्या चिमुकल्यांना मिळणार ‘चिमणीघर’ची माया; पोलिस आयुक्तांकडून उद्‍घाटन, बंद पडलेले ‘पाळणाघर’ पुन्हा सुरू

धक्कादायक घटना! 'सुरक्षारक्षकाचा पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार'; बेलतरोडीतील सिंगापूर कॉलनीतील घटना, नागपूर जिल्ह्यात खळबळ

Cough Syrup: चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर सरकारला अॅक्शन मोडमध्ये, औषधांच्या गुणवत्तेबद्दल आणि वापरावर मोठा निर्णय घेतला

Latest Marathi News Live Update: कारंजा लाड येथे २३.६० ग्रॅम अमली पदार्थ जप्त,दोघे पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT