वाणगाव, ता. ५ (बातमीदार) ः डहाणू तालुक्यात सप्टेंबरच्या अखेरीस झालेल्या पावसामुळे भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सद्यस्थितीत तालुक्यात एकूण सहा हजार ६०३.३० हेक्टर क्षेत्राचे पंचनामे नोंदवण्यात आले आहेत. उर्वरित पंचनामे लवकरच पूर्ण होतील, असे कृषी विभागामार्फत सांगण्यात आले.
कापणीसाठी तयार झालेले भातपीक आडवे पडले आहे. सततच्या पडलेल्या पावसामुळे भातपीक शेतातून काढता न आल्याने भाताला मोड आले आहेत. यामुळे भाताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चिकूचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यात सहाय्यक कृषी अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्यामार्फत नुकसानग्रस्त भागांची पाहणी व पंचनामा नोंदवण्याचे काम सुरू आहे.
पंचनाम्यादरम्यान निरीक्षणे
२८ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीसदृश पावसामुळे भातपीक शेतात आडवे पडले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्याने शेतकऱ्यांना शेतात पडलेले भातपीक शेताच्या बाहेर काढता आले नाही. यामुळे अद्यापही पीक शेतात असून भातपिकाच्या लोंब्यांना मोड आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, असे डहाणू कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना पंचनामे करताना लक्षात आले आहे.
चिकू फळाचेही नुकसान
डहाणू तालुक्याचे चिकू पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र दोन हजार ९७५ हेक्टर आहे. सध्या चिकू पिकास फुलकळी व छोटी फळे अवस्थेत असून सतत पडणाऱ्या पावसामुळे व नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीसदृश पावसामुळे मोठ्या प्रमाणात फळगळ व फुलगळ झाल्याचे दिसून येत आहे.
डहाणू तालुक्यात सहा हजार ६०३ पंचनामे
तालुक्यातील डहाणू, मल्याण, चिंचणी, कासा, सायवण, आंबेसरी, आशागड, चारोटी आणि वाणगाव या नऊ महसूल मंडळात एकूण १६ हजार ५२२ क्षेत्र भातपीक लागवडीखाली आहे. ३० सप्टेंबरपासून सद्यस्थितीपर्यंत सहा हजार ६०३ पंचनामे नोंदविण्यात आले आहेत, अशी प्राथमिक आकडेवारी डहाणू कृषी विभागामार्फत देण्यात आली आहे.
बाधित पिकांचे पंचनामे करण्याचे काम वेगाने सुरू आहे. सहाय्यक कृषी अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी यांच्या माध्यमातून संयुक्तपणे पंचनामा करणे सुरू आहे. लवकरच उर्वरित पंचनामे पूर्ण होतील.
- अनिल नरगुलवार, तालुका कृषी अधिकारी, डहाणू