एक सही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी अभियानाला प्रतिसाद
कल्याण (वार्ताहर) : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना तातडीने राबवण्याच्या मागणीसाठी हर्ष फाउंडेशनच्या माध्यमातून कल्याण पूर्वेमध्ये स्वाक्षरी अभियान घेण्यात आले. या अभियानाला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कल्याण पूर्वेच्या पुना लिंक रोडवरील सेंट जुडस शाळेसमोर हे स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले.
कल्याण पूर्वेतील हजारो शाळकरी मुलं आज जीव मुठीत धरून शाळेपर्यंतचा प्रवास करत आहेत. पुना लिंक रोडवर आतापर्यंत झालेले अनेक लहान मोठे अपघात पाहता या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर हर्ष फाउंडेशनतर्फे वाहतूक पोलिस, पालिका प्रशासनासह स्थानिक लोकप्रतिनिधींकडेही या गंभीर विषयासाठी पाठपुरावा केला जात असल्याचे फाउंडेशनकडून सांगितले. विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता या महत्त्वाच्या मार्गावर रस्ता दुभाजक बसविणे, झेब्रा क्रॉसिंग आणि सिग्नल यंत्रणा बसविणे, शाळा सुटताना-भरताना वाहतूक पोलिस ठेवणे, अवजड वाहनांची वाहतूक फक्त रात्री ८ ते पहाटे ६ या वेळेतच सुरू ठेवणे, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पुढे शाळा आहे, वाहने सावकाश चालवा असे मोठे फलक लावणे अत्यावश्यक बनले आहे. त्यासाठी हे स्वाक्षरी अभियान घेतले असल्याचे आयोजकांनी सांगितले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी हर्ष फाउंडेशनचे संस्थापक हर्षल शिंदे, अध्यक्षा उर्मिला चौधरी, सचिव अश्विनी बंदीचौडे, सभासद कीर्ती नारखेडे, प्रमिला बढे, पल्लवी शिंदे आणि आदित्य व्यापारी आदींनी विशेष मेहनत घेतली.