नरवीरभूमी ते शिवप्रतापभूमी पदयात्रा उत्साहात
पोलादपूर (बातमीदार) : नवरात्रोत्सवानिमित्त पोलादपूर येथील महादेव डोंगर शिवभक्त पदयात्री ग्रुपतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही नरवीरभूमी पोलादपूर ते शिवप्रतापभूमी प्रतापगड पदयात्रा उत्साहात पार पडली. या वर्षीची पाचवी पदयात्रा असून, एकूण २२ शिवभक्त पदयात्रींनी यात सहभाग घेतला. सततच्या पावसाची रिपरिप आणि रस्त्यावरील चिखल यांची पर्वा न करता पदयात्रींनी ३१ किलोमीटरचा प्रवास भक्तिभावाने पूर्ण केला. पोलादपूरहून निघालेल्या या पदयात्रेच्या वेळी ‘यंग ब्लड अॅडव्हेंचर’ संस्थेच्या माध्यमातून १९८३ पासून दरवर्षी प्रज्वलित होणारी भवानी ज्योत, याही वेळी पोलादपूर येथे आणण्यात आली. मागील तीन वर्षांपासून या पदयात्रेदरम्यान भवानी ज्योतीचे दर्शन घेण्याची प्रथा सुरू आहे. पोलादपूर ते प्रतापगड या पदयात्रेचा उद्देश शिवभक्तीची भावना जागृत ठेवणे आणि तरुण पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची ओळख करून देणे हा आहे. पावसातही न डगमगता चालत जाणाऱ्या या शिवभक्तांनी अखंड जयघोष, ढोल-ताशांचा नाद आणि जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणांनी वातावरण भारून टाकले.
......................
रोहा उर्दू शाळेचे मुख्याध्यापक गजनफर कलाब सेवानिवृत्त
रोहा (बातमीदार) : पीएम नगरपरिषद उर्दू शाळा, रोहा क्र. ४ चे ज्येष्ठ मुख्याध्यापक गजनफर हसन कलाब यांचा सेवानिवृत्ती समारंभ शनिवारी उत्साहात पार पडला. ३९ वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी उर्दू शिक्षणाला दिलेले योगदान आणि विद्यार्थ्यांच्या घडणीसाठी घेतलेला परिश्रम याबद्दल त्यांचा गुणगौरवपूर्वक सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात मस्जिद कमिटी अध्यक्ष अलीम मुमेरे, माजी नगरसेवक महंमद डबीर, अहमद दर्जी, अंजुमन चेअरमन अब्दुल कादिर रोगे, रेवा संस्थेचे सदस्य उस्मान रोहेकर, सैफुल्ला फिरफिरे, मंजर शरीफ आदी मान्यवर उपस्थित होते. शाळेच्या नवनियुक्त मुख्याध्यापिका मैमुना जळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. शिक्षकवर्गात नजीर मशालकर, इनायत कोंडविलकर, सबा कारानी, निलोफर अधिकारी, रियाज मोमीन, सना सिद्दीकी आदींचा सक्रिय सहभाग होता. कलाब यांनी शाळेतील शिक्षणव्यवस्था, शिस्त आणि विद्यार्थी विकासात दिलेल्या योगदानामुळे त्यांची ओळख एक शांत, संयमी आणि कार्यतत्पर शिक्षक म्हणून निर्माण झाली. त्यांच्या सेवेला पालक, शिक्षक व समाजातील विविध घटकांकडून दाद मिळाली.
........................
विकासाचा मुद्दा ठेवूनच निवडणूक लढविली ः खा. सुनील तटकरे
रोहा, ता. ५ (बातमीदार) : मी नेहमी विकासाचाच मुद्दा पुढे ठेवून निवडणूक लढविली आणि त्यातून जनतेचा विश्वास संपादन केला. पुढील काळातही हा विकासाचा प्रवास अखंड सुरू राहील, असे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी केले.
सुतारवाडी परिसरातील येरळ ग्रामपंचायतीत आयोजित दसरा स्नेहसंमेलन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी येरळ ग्रा. पं. सरपंच सुरेश जाधव, उपसरपंच कविता तटकरे, विनिता महाडिक, प्रसाद मोरे, चारूला निळेकर, संजय मुंबरे तसेच परिसरातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी पुढे खासदार तटकरे म्हणाले, या परिसराचा सर्वांगीण आणि प्रदूषणविरहित औद्योगिक विकास व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. येथील युवकांना रोजगार मिळावा यासाठी कौशल्यविकास प्रशिक्षणाचे उपक्रम सुरू केले आहेत. या प्रसंगी तटकरे यांचा भारत भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल नागरी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय महाडिक यांनी केले. तटकरे पुढे म्हणाले की, कै. दत्ताजीराव तटकरे आणि स्वातंत्र्यसैनिक बापूसाहेब रसाळ यांनी ४१ वर्षांपूर्वी या स्नेहसंमेलनाची परंपरा सुरू केली होती, ती आजही जिवंत आहे. कार्यक्रमाला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले.
........................
खोपोलीत बंगल्यातील लॅपटॉपची बॅग लंपास
खालापूर (बातमीदार) : खोपोलीतील लक्ष्मीनगर झेनिथ कॉर्नर भागात शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास लॅपटॉप चोरीची घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी मिहीर बंगल्याच्या उघड्या दरवाजातून आत प्रवेश करून पहिल्या मजल्यावरील हॉलमध्ये ठेवलेली लॅपटॉपची बॅग आणि रोख रक्कम असा एकूण २३, ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी खोपोली पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस हवालदार संदीप चव्हाण करत आहेत. स्थानिक नागरिकांनी परिसरातील सुरक्षा उपाययोजना अधिक कडक करण्याची मागणी केली आहे. अलीकडच्या काळात खालापूर तालुक्यात अशा प्रकारच्या घरफोड्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.