कल्याण पूर्वेत खड्ड्यांची स्पर्धा
मातोश्री गुंजाई संस्थेचा अनोखा उपक्रम
कल्याण, ता. ५ (बातमीदार) : कल्याण पूर्वेतील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून, मार्गाची चाळण झाली आहे. यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. वारंवार लक्ष वेधूनही प्रशासनाचे डोळेझाक करत असल्याने अखेर पूर्वेतील रस्त्यांवरील खड्ड्यांविरुद्ध मातोश्री गुंजाई संस्थेच्या वतीने माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी खास स्पर्धा आयोजित केली आहे.
स्पर्धेच्या माध्यमातून खड्ड्यांच्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न महेश गायकवाड यांनी केला आहे. पूर्वेतील अनेक रस्त्यांची परिस्थिती काही केल्या बदलत नसल्याने गायकवाड यांनी अशा पद्धतीने लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. हे व्हिडिओ आम्ही ऑस्कर आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी पाठवू. यामुळे कल्याण पूर्वेतील खड्ड्यांचा विश्व विक्रम होईल आणि संपूर्ण जगाला कळेल, असेही ते म्हणाले. यासंदर्भात पूर्वेतील काही महाविद्यालयीन तरुणांनी खड्ड्यांच्या रील्स बनवायलाही सुरुवात केल्याचे सांगण्यात आले आहे.
अशी आहे स्पर्धा
या स्पर्धेत भाग घेणाऱ्यांनी कल्याण पूर्वेतील खड्ड्यांचे ३० सेकंदांपासून एक मिनिटांपर्यंत व्हिडिओ काढून स्पर्धेत पाठवावा. स्पर्धेत विजेत्यांना महेश गायकवाड यांच्या कार्यालयातून रोख बक्षीस आणि अन्य आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत. पूर्ण झालेले व्हिडिओ घेऊन गुंजाई चौक, संतोष नगर, कल्याण पूर्व येथे कार्यालयात यावे व आपले रोख बक्षीस घेऊन जावे, असे आवाहन महेश गायकवाड यांनी विशेषतः तरुणांना केले आहे.