दीपक हिरे : सकाळ वृत्तसेवा
वज्रेश्वरी, ता. ५ : ठाणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र वज्रेश्वरी, गणेशपुरी आणि अकलोली काही महिन्यांपासून सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे अंधारात अडकले आहेत. या गावांमध्ये दिवसाचे काही तास सोडले तर बाकी वेळ वीज गायब असल्याने नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या तिन्ही गावांत नवरात्री व दसरा सणही ग्रामस्थांना अंधारात साजरे करावे लागले.
वज्रेश्वरी योगिनी देवीमंदिर, स्वामी नित्यानंद महाराज समाधी मंदिरमुळे प्रसिद्ध असलेले गणेशपुरी, तसेच तानसा नदीकाठी असलेल्या अकलोली येथील गरम पाण्याची कुंड असे तीन तीर्थक्षेत्र आहे. या तिन्ही गावांतील वीज समस्येबाबत या पूर्वी भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांनी संबंधित विभागाचे अधिकारी बोलावून गणेशपुरी येथे बैठक घेतली होती. या प्रयत्नांचा काहीही परिणाम झालेला नाही. त्यामुळे स्थानिक नागरिक संतापले आहेत. काही लोकांच्या मते, या परिसराला कुणी लोकप्रतिनिधी नसल्याने अंधारात राहण्याची वेळ आल्याची भावना निर्माण झाली आहे.
ग्रामस्थांच्या मते, तीन महिन्यांपासून वीजवितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे वीजपुरवठा सतत खंडित होत आहे. यामुळे पाणीपुरवठा योजना ठप्प पडली आहे. दुसरीकडे बँक व्यवहारही अडले आहेत. विजेवर चालणारी उपकरणे बंद राहिल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. रात्री दर तासाला वीज जाते आणि एकदा गेल्यानंतर तीन तासांपर्यंत अंधारच असतो. त्यामुळे सर्व धार्मिक सणवारही बहुतेक वेळा अंधारात साजरे करावे लागतात आणि ग्रामस्थांना ही परिस्थिती सहन करावी लागते. स्थानिक प्रशासन आणि वीजवितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे ही तीर्थक्षेत्रे अंधारात आहेत. सणवार, धार्मिक कार्यक्रम तसेच दैनंदिन जीवन प्रभावित झाले आहे. ग्रामस्थांनी अनेकदा तक्रारी केल्या, आंदोलनांचे इशारे दिले, तरी काही उपाययोजना झाली नाही.
पारोळ उपकेंद्रातील अडचणींमुळे वीजपुरवठा खंडित
पारोळ उपकेंद्रामध्ये वारंवार तांत्रिक अडचणी येत असतात. तसेच, नालासोपारा फिडरवरही काही तांत्रिक अडचणी आल्यास पारोळ लाईनच्या शेवटच्या टोकावरील तीर्थक्षेत्रांमध्ये वीजपुरवठा खंडित होतो. कारण तांत्रिक बिघाडामुळे स्विच बंद करावे लागते. यामुळे वीजपुरवठा सतत खंडित होत आहे, असे स्पष्टीकरण वीजवितरण कंपनीच्या गणेशपुरी विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रदीप मुंडे यांनी दिले.
तीर्थक्षेत्रांची वैशिष्ट्ये
वज्रेश्वरी : योगिनी देवी मंदिरामुळे सुप्रसिद्ध
गणेशपुरी : स्वामी नित्यानंद महाराज समाधी मंदिरामुळे ओळखले जाणारे
अकलोली : तानसा नदीकाठी असलेली गरम पाण्याची कुंड