भिवंडी, ता. ५ (बातमीदार) : तालुक्यातील खोणी ग्रामपंचायतीत जानेवारी २०१६ ते जुलै २०१७ या कालावधीत मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर तत्कालीन ग्रामविकास अधिकारी राम जगन्नाथ म्हस्के यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात फौजदारी कारवाई करण्याचे आदेश ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी दिले आहेत.
तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य शाहनवाज इम्तियाज कुरेशी यांनी या आर्थिक गैरव्यवहाराबाबत तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, ग्रामविकास अधिकारी म्हस्के यांनी ग्रामनिधी आणि वित्त आयोग निधीअंतर्गत मोठ्या रकमेचा अपहार केला. तीन लाख रुपयांवरील कामांसाठी खुल्या निविदा प्रक्रिया बंधनकारक असताना त्यांनी मर्जीतल्या ठेकेदारांना काम दिले. खोटे धनादेश काढून ठेकेदारांच्या नावाने रक्कम देण्याऐवजी ती रोख स्वरूपात काढून एक कोटी रुपयांहून अधिक बोगस पेमेंट केल्याचा आरोप करण्यात आला होता. या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांना दिले होते. चौकशीदरम्यान म्हस्के हे वारंवार गैरहजर राहिले; तसेच आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून दिली नाहीत. त्यामुळे त्यांनी जाणीवपूर्वक हलगर्जी आणि गैरवर्तणूक केल्याचे निष्पन्न झाले. मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी भिवंडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गोविंद खामकर यांना अंतिम वसुली निश्चित करून संबंधित रक्कम वसुल करण्यास आणि आवश्यक जप्ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
दीड कोटी निधीबाबत जबाबदार
ठाणे विधी लेखा कार्यालयाच्या तपासणीनंतर आणि कोकण विभागाचे सहाय्यक आयुक्त (चौकशी) यांनी सादर केलेल्या अहवालानुसार सर्व आरोप सिद्ध झाले आहेत. स्थानिक निधी लेखा परीक्षणानुसार, म्हस्के हे एक कोटी ४० लाख ३९ हजार ७३८ रुपये इतक्या निधीबाबत जबाबदार असल्याचे निष्पन्न झाले आहे.