‘एशियाटिक’च्या टाऊन हॉलची दुरवस्था
पीओपीचा भाग कोसळला; पायऱ्यांना भेगा, छताला गळती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : एशियाटिक सोसायटी व्यवस्थापन समितीसाठी नोव्हेंबरमध्ये निवडणूक होणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर सदस्य होण्यासाठी आलेल्या अर्जांच्या महापुरामुळे एशियाटिकने सर्वांचे लक्ष वेधले आहे. दुसरीकडे एशियाटिकच्या रुबाबदार टाऊन हॉल इमारतीची दुरवस्था झाली आहे. छत गळतीमुळे काही ठिकाणी पीओपीचा भाग कोसळला आहे. एशियाटिकच्या ऑयकॉनिक पायऱ्यांमध्ये काही ठिकाणी भेगा पडल्या आहेत. तीन महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार करूनही दुरुस्तीला अजून सुरुवात झाली नसल्याची बाब समोर आली आहे.
मुंबईच्या सांस्कृतिक मूल्यांचा जेव्हा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा एशियाटिक सोसायटीचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. एशियाटिकच्या नगरभवनला मुंबईचे ‘तुळशी वृंदावन’ असेही संबोधले जाते. ग्रिक, गाॅथिक शैलीच्या आकर्षक बांधकाम व वास्तूस मुंबईच्या हेरिटेज यादीत मानाचे स्थान आहे. १८२१ ते १८३३ दरम्यान या टाऊन हॉलचे बांधकाम करण्यात आले. १० भव्य संगमरवरी पुतळे, अतिभव्य हॉल, ग्रंथ ठेवण्यास प्रशस्त लाकडी मांडण्या, लाकडी टेबल, खुर्च्या असे मनमोहक फर्निचर, वाचनासाठी उत्साहवर्धक वातावरण या टाऊन हॉलमध्ये आहे. या टाऊन हॉलची मालकी मुंबई जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे. यापूर्वी टाऊन हॉल इमारतीच्या समोरील बाजूला दरवर्षी न चुकता रंगरंगोटी केली जात होती. स्वातंत्र्यदिनाचा विशेष शासकीय कार्यक्रम होत होता. मात्र देखभालीअभावी या वास्तूची आता दुरवस्था झाली आहे. एशियाटिकच्या भव्य पायऱ्यांना मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. खाबांचे प्लास्टर उखडले आहे. स्वच्छतागृहे गळके व अस्वच्छ आहेत.
राज्याच्या ग्रंथालय संचालकांच्या कार्यालयाकडील भागात व एशियाटिकच्या सचिवांच्या कार्यालयात पीओपीचा काही भाग कोसळला आहे. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही; मात्र तीन महिने झाले तरी अजून दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे अजून उर्वरित छत कोसळते की काय, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे नगरभवनच्या हाॅलमधील जे भव्य पिलर व पुस्तकांच्या असंख्य कपाटांचे वजन पेलणारे तळघरातील लाकडी खांब जमिनीखाली पृष्ठभागापासून कुजलेले आहेत. अतिवजनामुळे येथे दुर्घटना होऊ शकते, अशी परिस्थिती आहे. यासंदर्भात लेखी तक्रार केली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती एशियाटिक व्यवस्थापन समितीच्या एका पदाधिकाऱ्याने ‘सकाळ’शी बोलताना दिली.
राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली सुप्रसिद्ध वास्तुविशारद आभा लांबा यांना संवर्धनाचे काम दिले होते. २००६ते २००९ मध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून या इमारतीचे संवर्धन करण्यात आले; मात्र या इमारतीची दुरवस्था झाली आहे. या सर्व परिस्थितीमुळे नगरभवनचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची आवश्यकता आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तीन महिन्यांपूर्वी तक्रार केली. काही दिवसांत दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होणार आहे. या वेळी खूप पाऊस झाल्यामुळे छत गळती झाली आहे. टाऊन हॉलला देखभाल-दुरुस्तीची गरज आहे.
- अशोक गाडेकर, ग्रंथालय संचालक, महाराष्ट्र राज्य
मुंबईचे वैभव असलेल्या टाऊन हॉलकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. दुसरीकडे ही परिस्थिती सुधारण्यासाठी एशियाटिक व्यवस्थापन समितीने ठोस पावले उचलली नाहीत. त्यामुळे ऐतिहासिक आणि अनमोल ग्रंथसंपदा धोक्यात आली आहे.
- प्रकाश रेड्डी, नेते, भाकप
एशियाटिकच्या टाऊन हॉलची दुरवस्था
- आयकॉनिक पायऱ्यांना भेगा
- गळके छत, पीलर्सचे प्लास्टर उखडले
- बाथरूम, टॉयलेट गळके व अस्वच्छ
- रंगरंगोटीअभावी भिंती काळवंडल्या
- पीओपीचा काही भाग कोसळला
- लाकडी खांब जमिनीखाली पृष्ठभागापासून कुजले
- काही खिडक्यांची तावदाने फुटली, लाकूड कुजले
- स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची गरज
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.