अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
आरोपीला पोलिस कोठडी
टिटवाळा, ता. ७ (वार्ताहर) : कल्याण तालुका पोलिस स्टेशनच्या हद्दीत शिक्षणासाठी आलेल्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या बहिणीच्या पतीनेच वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत आरोपीला अटक केली आहे.
पीडित मुलगी आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी बहिणीच्या घरी वास्तव्यास होती. बहीण घरी नसताना तिच्या पतीने पीडित अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले तसेच हा प्रकार कोणाला न सांगण्यासाठी धमकावले. आरोपीने बहिणीच्या गैरहजेरीचा फायदा घेऊन पीडितेसोबत वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित केले. या अत्याचारांमुळे अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. गुन्हा उघडकीस येण्याच्या भीतीने आरोपीने गर्भपात करण्याचाही प्रयत्न केला, परंतु वेळ निघून गेल्यामुळे ते शक्य झाले नाही. अखेरीस पीडित मुलीने एका बाळाला जन्म दिला आहे. सध्या पीडित मुलीवर ठाणे येथे उपचार सुरू आहेत.
आरोपीविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सरला काळे करीत आहेत.
मदत आणि सुरक्षा व्यवस्था
पीडित मुलीच्या मनोबलाची काळजी घेणे आणि तिला आवश्यक वैद्यकीय उपचार देणे याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. पोलिस यंत्रणा आणि विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून पीडितेला तत्काळ मदत आणि पूर्ण सुरक्षा व्यवस्था पुरविण्याची व्यवस्था केली जात आहे. या धक्कादायक घटनेमुळे स्थानिक समाजात तीव्र संताप आणि चिंता व्यक्त होत आहे. तसेच अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.