रोगप्रतिबंधक फळांचे भाव गगनाला
चार महिन्यांत मलेरियाचे ६२१, डेंगीचे ४०५ रुग्ण; किवी, ड्रॅगन फ्रूट आणि पपईला मागणी
ठाणे, ता. ७ (बातमीदार) : पावसामुळे साचलेल्या पाण्यामुळे मच्छरांचा प्रादुर्भाव वाढल्याने ठाणे शहरात डेंगी व मलेरियाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या चार महिन्यांत मलेरियाचे एकूण ६२१, तर डेंगीचे ४०५ रुग्ण आढळले आहेत. रुग्णसंख्या वाढल्यामुळे त्यावर उपायकारक मानल्या जाणाऱ्या किवी, ड्रॅगन फ्रूट आणि पपई यांसारख्या फळांना तसेच पपईच्या पानांना मोठी मागणी वाढली आहे. डेंगी आणि मलेरियामुळे रुग्णांच्या शरीरातील प्लेटलेट्स आणि पांढऱ्या पेशींची संख्या कमी होते. यामुळे डॉक्टर उपचारांसह आहारात किवी, पपई, पपईच्या पानांबरोबरच ड्रॅगन फ्रूट यांसारखी रोगप्रतिबंधक फळे घेण्याचा सल्ला देत आहेत. त्यामुळे ठाणे बाजारात या फळांची मागणी वाढली असून, यंदा फळांची आवक मुबलक असल्याने भाव स्थिर आहेत, ज्यामुळे रुग्णांना आर्थिक दिलासा मिळत आहे, असे फळविक्रेते धीरज गुप्ता यांनी सांगितले.
ठाणे महापालिकेने मच्छरांच्या प्रतिबंधासाठी नियमित धूर आणि औषध फवारणी केली असून, नागरिकांनाही घरातील साचलेल्या पाण्याची योग्य व्यवस्था करण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः पाणी साठवणाऱ्या टाक्या झाकून ठेवाव्यात, प्लॅस्टिक, बाटल्या, टायर यांचा योग्य प्रकारे निपटारा करावा, गटार आणि नाल्यांची स्वच्छता नियमित करावी, असे सांगितले आहे. तसेच सकाळ-संध्याकाळ डास जास्त असलेल्या वेळी पूर्ण बाह्य कपडे घालणे, डास प्रतिबंधक क्रीम किंवा लोशन वापरणे आणि जास्त डास असलेल्या ठिकाणी जाणे टाळण्याचा सल्लाही दिला जात आहे.
महापालिकेकडून मच्छरांचा उपद्रव कमी करण्यासाठी धूर आणि औषध फवारणी केली जात आहे. पाणी साठवणुकीबाबत महापालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे. आठवड्याहून अधिक काळ पाण्याचा साठा न करणे, साठवलेले पाणी पूर्णपणे रिकामे करणे, पाणी साठवणाऱ्या टाक्या झाकून ठेवणे आणि प्लॅस्टिक, बाटल्या, टायर यांचा योग्य निपटारा करावा, असे आवाहन केले आहे. ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी नागरिकांना संरक्षणात्मक उपाय करण्यास सांगितले आहे: पूर्ण बाह्यांचे कपडे वापरणे (विशेषतः सकाळ-संध्याकाळ), डास प्रतिबंधक क्रीम/लोशन वापरणे आणि डास जास्त असलेल्या भागात जाणे टाळणे.
वाढत्या रुग्णसंख्येचा आलेख
सप्टेंबरअखेरपर्यंत आढळलेल्या रुग्णांच्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट महिन्यात मलेरियाचे सर्वाधिक २४३ रुग्ण, तर जुलै महिन्यात डेंगीच्या १५६ रुग्णांची नोंद झाली आहे.
आरोग्य विभागाचे आवाहन
मच्छरांचा उपद्रव कमी करण्यासाठी महापालिकेकडून धूर आणि औषध फवारणी केली जात आहे, तसेच नागरिकांनाही खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
पाणी साठवणूक
आठवड्यापेक्षा जास्त काळ पाणी साठवू नका; साठवलेले पाणी पूर्णपणे रिकामे करा; पाण्याच्या टाक्या झाकून ठेवा.
स्वच्छता
प्लॅस्टिक वस्तू, बाटल्या, टायर आणि नारळाच्या करवंट्या यांचा योग्य निपटारा करा; गटारे आणि नाल्यांची नियमित सफाई करा.
रुग्णसंख्येचा तपशील (जून ते सप्टेंबर २०२५)
महिना मलेरिया डेंगी
जून ९१ ८५
जुलै ९६ १५६
ऑगस्ट २४३ ९७
सप्टेंबर १९१ ६७
एकूण ६२१ ४०५
फळांचे भाव (ठाणे बाजारात)
फळ भाव (रुपयांत)
ड्रॅगन फ्रूट (विदेशी) ७०-८० (प्रत्येकी)
ड्रॅगन फ्रूट (स्वदेशी) ५०-६० (प्रत्येकी)
पपई ७०-८०
किवी (३ नग) १२०
किवी (५ नग) ३००