मुंबई

कल्याण अवती-भवती

CD

एस.एस.टी. महाविद्यालयाचा सन्मान
कल्याण, १० ऑक्टोबर (वार्ताहर): एस.एस.टी. कला आणि वाणिज्य महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाच्या ५८ व्या युवा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते विशेष सन्मानित करण्यात आले. मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीच्या वेळी हा गौरव समारंभ पार पडला. महाविद्यालयाच्या संजीवनी सांस्कृतिक समितीने मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवाच्या ठाणे विभागीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन केले होते. एस.एस.टी. महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यशाळेत ठाणे जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांचे सांस्कृतिक समिती प्रमुख, समन्वयक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यशाळेतून त्यांनी युवा महोत्सवाची रचना, नियम आणि सहभागाची प्रक्रिया जाणून घेतली. सन्मानप्रसंगी कुलगुरूंनी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक समितीच्या कार्याचे आणि विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक जाणीव वाढविणाऱ्या उपक्रमांचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहन दिले. यावेळी विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील, सांस्कृतिक समन्वयक प्रा. अतुल सावे यांच्यासह महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य डॉ. पुरस्वानी, समितीचे समन्वयक डॉ. तुषार वाकसे, डॉ. हर्षदा दरेकर, प्रा. मायरा लाछानी, प्रा. अर्चना नायर आणि स्वयंसेवक उपस्थित होते.
...........................

रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण तर्फे अंबिवलीत ग्रंथालय
कल्याण (वार्ताहर): रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणतर्फे ''हॅपी स्कूल'' या उपक्रमांतर्गत अंबिवली येथील वाल्मिकी विद्यालयात नवीन ग्रंथालय उभारण्यात आले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावण्यासाठी क्लबने विद्यालयाला २ कपाटे आणि २०० हून अधिक पुस्तके प्रदान केली. शाळेतील ५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना या योगदानाचा थेट फायदा होणार आहे. ग्रंथालयाचे हे कार्य विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी कौतुकास्पद ठरले आहे. क्लबने दिवाळीनंतर शाळेच्या गरजेनुसार आणखी पुस्तके देण्याचे आश्वासन दिले आहे. रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणचे प्रकल्पप्रमुख अॅड. सचिन शेटे, अध्यक्ष धीरेंद्र सिंग आणि सचिव नामदेव चौधरी यांच्या विशेष पुढाकाराने हे ग्रंथालय यशस्वीरित्या साकारण्यात आले. या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना वाचनाची आणि ज्ञानाची नवी संधी उपलब्ध झाली आहे.
..............................

उपराष्ट्रीय पोलिओचे आज लसीकरण
कल्याण (वार्ताहर): जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनेनुसार, जिल्हा ठाणे आणि महानगर पालिका ठाणे, नवी मुंबई कार्यक्षेत्रात रविवार, १२ ऑक्टोबर रोजी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओची लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. कल्याण तालुक्याची एकूण लोकसंख्या दोन लाख ५९ हजार ९२३ असून, ० ते ५ वर्षांतील लाभार्थ्यांची संख्या २८ हजार ८०४ इतकी आहे. या लाभार्थ्यांना पोलिओची मात्रा देण्यासाठी तालुक्यात २०२ बुथची व्यवस्था करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, अपवादात्मक परिस्थितीत बुथवर लस घेण्यासाठी न येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी कल्याण तालुक्यातील १ लाख ५ हजार २१ घरांमध्ये एकूण १८१ टीमद्वारे घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे. कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाळ यांनी नागरिकांना ० ते ५ वर्षे वयोगटातील मुलांना पल्स पोलिओ लसीची मात्रा बुथवरच देण्यासाठी उत्स्फूर्तपणे सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
........................

३५ वर्षांच्या सेवेनंतर वरिष्ठ निरीक्षक निवृत्त
कल्याण, (बातमीदार): मध्य रेल्वे सुरक्षा बल, डोंबिवली येथील वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र बलवंतराव राऊत यांनी ३५ वर्षांची निष्ठावान आणि निष्कलंक सेवा पूर्ण केल्यानंतर सेवानिवृत्ती स्वीकारली आहे. त्यांच्या सेवाकाळात त्यांनी उल्लेखनीय कार्य केल्यामुळे त्यांना २० पुरस्कार आणि पाच प्रमाणपत्रे मिळाली आहेत. अडचणीच्या व कठीण प्रसंगातही त्यांनी आपली जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडत अमूल्य कार्यकारी अनुभव मिळवला.त्यांच्या सेवानिवृत्ती समारंभात व्यावसायिक डॉ. सुनील खर्डीकर यांनी त्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले. यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, प्राध्यापक अनिल अंधारे, प्राचार्य संतोष सांगेवार, आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू करिष्मा खर्डीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. गजेंद्र राऊत यांनी त्यांच्या ३५ वर्षांच्या सेवायात्रेतील मूल्यवान अनुभव व आठवणी सर्वांसोबत शेअर केल्या. तसेच सेवानिवृत्तीनंतर आपल्या प्रेरणादायी पुढील जीवनाची नवी वाटचाल सुरू होत असल्याचे ते म्हणाले. सहकाऱ्यांनी, कुटुंबीयांनी आणि उपस्थितांनी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
..........

सरन्यायाधीश यांच्यावरील हल्ल्याचा निषेध
कल्याण (वार्ताहर): सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा कल्याणमध्ये विवेक विचार मंचच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेतील आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करत, मंचच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाळ यांना निवेदन दिले. विवेक विचार मंचने स्पष्ट केले की, देशाच्या सर्वोच्च न्यायसंस्थेच्या प्रमुखांवर झालेला हा अवमानकारक हल्ल्याचा प्रयत्न केवळ एका व्यक्तीवरचा हल्ला नसून, तो भारतीय न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेवरचा गंभीर आघात आहे. भारतीय लोकशाहीत मतभेद व्यक्त करण्याचे कायदेशीर मार्ग उपलब्ध असताना, अशा प्रकारे हल्ला करणे हे असंविधानिक, असभ्य व अवमानजनक कृत्य आहे. या घटनेच्या माध्यमातून काही समाजद्रोही, फुटीरतावादी आणि राजकीय शक्ती समाजात द्वेष आणि जातीय-धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचाही मंचने निषेध केला. हा प्रकार कोणत्याही धर्माशी किंवा समाजाशी संबंधित नसून, विकृत व असंविधानिक मानसिकतेचा परिणाम आहे. न्यायसंस्थेचा सन्मान राखणे ही प्रत्येक भारतीयाची नैतिक जबाबदारी आहे, असे मत व्यक्त करत, या घृणास्पद कृत्याची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी विवेक विचार मंचने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Namibia historic win Video : नामिबियाच्या धडाकेबाज बॅट्समनने रोमांचक सामन्यात शेवटच्या चेंडूवर मारला कडक चौकार अन् घडवला इतिहास!

Uddhav Thackeray : सरकारचे ‘पॅकेज’ म्हणजे सर्वांत मोठी थाप; दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना एक लाखाची मदत द्या

Pimpri News : खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या मनमानीला आळा बसणार

Namibia beat South Africa: आरारारारा...खतरनाक! नामिबियाने चक्क दक्षिण आफ्रिकेला केलं पराभूत; क्रिकेटमध्ये घडवला नवा इतिहास

Palghar News : पालघरच्या प्रारूप मतदार यादीमध्ये झोलंमझाल; मनसे आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

SCROLL FOR NEXT