शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचा भाड्यावर उदरनिर्वाह!
नवे प्रकल्प, निधी हाती नाही; सरकारची अनास्था
बापू सुळे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : मुंबापुरीला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी राज्य सरकारने १९९८मध्ये स्थापन केलेल्या शिवशाही पुनर्विकास प्रकल्प लिमिटेड या सरकारी कंपनीचा सध्या केवळ संक्रमण सदनिकांच्या भाड्यावर उदरनिर्वाह सुरू आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत गृहनिर्माण योजनांचे नियोजन आणि अंमलबजावणी करणे हा प्रमुख उद्देश असतानाही सध्या या कंपनीकडे एकही पुनर्वसन प्रकल्प नाही, पुरेसे कर्मचारी नाहीत. त्यामुळे त्यांच्या मालकीच्या असलेल्या संक्रमण सदनिका भाड्याने देणे आणि भाडे वसूल करणे एवढेच काम होताना दिसत असून, अन्य कोणत्याही नवीन घडामोडी घडताना दिसत नाहीत.
शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाच्या माध्यमातून मुंबईतील झोपडपट्टी निर्मूलनासाठीचे नियोजन केले जाते. त्यानुसार कंपनीने सुरुवातीच्या १५ वर्षांत १० हून अधिक झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केले असून, १०-१२ हजार झोपडीधारकांना हक्काचा निवारा दिला आहे. मात्र गेल्या दशकभरात अपुरा निधी, अपुरे अधिकारी-कर्मचारी आणि सरकारच्या अनास्थेमुळे शिवशाही पुनर्वसन प्रकल्प साइडलाइनला गेला असल्याने प्रकल्प राबवता आलेला नाही. त्यामुळे केवळ उपलब्ध असलेल्या संक्रमण सदनिका विकसकांना भाड्याने देणे आणि भाडे वसूल करणे हेच काम सुरू आहे.
खासगी विकसकांना पाच हजार सदनिका
शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाची मुंबईत पूर्व आणि पश्चिम उपनगरांत मानखुर्द, भांडुप, मुलुंड, कांदिवली, मालाड अशा वेगवेगळ्या १६ ठिकाणी पाच हजारांहून अधिक संक्रमण सदनिका आहेत. त्याचा संक्रमण शिबिर म्हणून वापर केला जात आहेत. या सदनिका खासगी विकसकांना गेल्या १० वर्षांपासून भाड्याने दिल्या आहेत. सुमारे ४० हजार रुपये डिपॉझिट आणि चार हजार रुपये भाडे आकारले जात असले तरी अनेक विकसकांनी कोट्यवधी रुपयांचे भाडे थकवले आहे. या थकबाकीचा आकडा ६०-७० कोटी रुपयांच्या घरात आहे.
धारावीसाठी डीआरपीला ३३४ सदनिका देणार
शिवशाहीच्या धरावी शेड कॉम्प्लेक्स येथे ३३४ संक्रमण सदनिका असून, त्या धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी डीआरपीला दिल्या जाणार आहेत. त्या माध्यमातून शिवशाहीला प्रति सदनिकेसाठी सुमारे ८,१०० रुपये भाडे मिळणार आहे. सुरुवातीला पाच वर्षांसाठी देण्याबाबत करार केला जाणार आहे. धारावीतील ३३४ घरे डीआरपीला देण्याची प्रक्रिया सुरू असतानाच उपनगरांत वेगवेगळ्या ठिकाणी असलेली १३४ घरे मिळावीत म्हणून अदाणी कंपनीने शिवशाहीकडे मागणी केली आहे.
म्हाडाला फुकटात ७५० घरे
शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाची उपनगरांत मुलुंड, कांदिवली, भांडुप, मानखुर्द, नाहूर, गोरेगाव अशा वेगवेगळ्या १७ ठिकाणी जवळपास ७५० घरे आहेत. ही घरे आपत्कालीन परिस्थितीत वापरण्याकरिता किंवा संक्रमण शिबिरासाठी राखीव ठेवली होती. म्हाडाने पावसाळ्यापूर्वी या घरांची मागणी केल्याने शिवशाहीने त्यांना तत्काळ दिली होती. आपत्कालीन वापरासाठी दिल्याने शिवशाहीने त्याचा कोणताही मोबदला मागितला नव्हता. मात्र म्हाडाने पावसाळा संपल्यानंतरही ही ७५० घरे आपल्याच ताब्यात ठेवली असून, अद्याप परत केलेली नाहीत. तसेच कोणतेही भाडे किंवा परतावा दिला जात नाही. त्यामुळे महिन्याला सुमारे ५० लाख रुपयांचा घाटा होत आहे.
१७९ भाड्याने देण्यासाठी जाहिरात
शिवशाहीची उपनगरांत सुमारे १७९ घरे अद्याप पडून आहेत. ती खासगी विकसकांना भाड्याने देण्याबाबत जाहिरात काढली आहे. आंबिवली अंधेरी पश्चिम येथे १४, गोळीबार मैदान खार येथे १०१, जोगेश्वरी पूर्व येथे ६४ घरे असून, ती भाड्याने देण्यासाठी खासगी विकसकांकडून निविदा मागवल्या आहेत.
एसआरएकडून प्रकल्प मिळेनात
मुंबई शहरासह उपनगरांतील वर्षानुवर्षे रखडलेले झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी एसआरए प्राधिकरणाकडून एमएमआरडीए, म्हाडा, महापालिका अशा विविध आस्थापनांना दिले जात आहेत. त्यापार्श्वभूमीवर शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाने काही प्रकल्प देण्याबाबत एसआरएकडे मागणी केली होती. तसेच पुनर्विकासासाठी सुमारे ४०० कोटी रुपये निधी असूनही त्यांच्याकडून सहा महिन्यांत एकही प्रकल्प दिला नसल्याची खंत शिवशाहीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
दीड वर्षात तीन एमडी, आता कोणीच नाही
शिवशाही पुनर्वसन प्रकल्पात येण्यासाठी सुरुवातीला अधिकारी उत्सुक असत. मात्र आता ना प्रकल्प, ना निधी अशी स्थिती निर्माण झाल्याने व्यवस्थापकीय संचालक (एमडी) म्हणून काम करण्यास सनदी अधिकारी फारसे उत्सुक नसल्याचे दिसत आहे. गेल्या दीड वर्षात तीन अधिकारी बदलून गेले आहेत. गुलाबराव खरात हे आठ-नऊ महिने एमडी म्हणून कार्यरत होते. त्यानंतर अझीझ शेख आले आणि तेही सात महिन्यांतच बदलून गेले. त्यांच्या जागी डॉ. संजय कोलते यांनी पदभार स्वीकारला खरा, पण अवघ्या दोन महिन्यांतच त्यांचीही पुणे येथे साखर आयुक्त म्हणून बदली झाली आहे. त्यामुळे आता नवीन एमडी कोण येणार आणि किती दिवस राहणार याबाबत अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.