दिवाळीत अनारशांची मागणी घटली
पारंपरिक चवीचा वारसा हरवतोय
महाड, ता. १२ (बातमीदार) ः दिवाळी म्हटले की लाडू, करंजा, चकल्या आणि तिखट-गोड पदार्थांनी सजलेले फराळाचे ताट डोळ्यांसमोर येते. परंतु या फराळात एकेकाळी मानाचे स्थान असलेला अनारसा आता हळूहळू ताटातून गायब होत चालला आहे. किचकट प्रक्रिया, वेळेचा अभाव आणि बदलती जीवनशैली यामुळे हा पारंपरिक गोड पदार्थ आता दुर्मिळ बनत आहे.
पूर्वी प्रत्येक घरात महिला स्वतःच्या हाताने अनारसे तयार करीत असत. भिजवलेला तांदूळ, किसलेला गूळ, तूप आणि खसखस यांच्या सहाय्याने तयार होणाऱ्या या पदार्थाची प्रक्रिया सहा ते सात दिवसांची असते. जाळीदार, कुरकुरीत आणि सोनसळी अनारसे तयार करण्यासाठी कौशल्य आणि संयम आवश्यक असतो. त्यामुळेच पारंपरिक सुगरणींच्या हातची अनारशांची चव खास मानली जात होती. मात्र आजच्या धावपळीच्या जीवनात महिलांना असा वेळ मिळत नाही. नोकरी, व्यवसाय आणि जबाबदाऱ्या यामुळे दीर्घ प्रक्रिया असलेल्या पदार्थांपासून लोक दूर जात आहेत. त्यातच अनारसे बनवण्याचे कौशल्य नव्या पिढीकडे पोहोचत नाही, ही खंत अनेक ज्येष्ठ महिला व्यक्त करतात. महाड येथील केटरर मंगला जोशी सांगतात, ‘‘पूर्वी हॉटेल व्यावसायिकसुद्धा माझ्याकडून अनारसे घेऊन जात. सकाळी तयार केलेले अनारसे अधिक जाळीदार बनतात, पण आता नव्या पिढीला ही कला शिकण्याची आवड उरलेली नाही. बाजारात ‘इन्स्टंट अनारसे’ किंवा तयार पिठाचे पर्याय उपलब्ध आहेत, पण त्या पदार्थांत मूळ पारंपरिक चव मिळत नाही. परिणामी पारंपरिक अनारशांची किंमत वाढली असून, सध्या ती सुमारे ९०० रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे.’’ कधी काळी फराळातील मानाचा तुकडा असलेला अनारसा आज फक्त जुन्या आठवणींत उरला आहे. काही ज्येष्ठ महिला अजूनही या परंपरेला जपत आहेत, पण त्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. काळानुसार स्वाद, पद्धती आणि सण साजरे करण्याची रीत बदलत असली, तरी अनारशासारख्या पदार्थांत दडलेली पारंपरिक गोडी आजही कोकणकरांच्या मनात कायम आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.