दिवाळीत डोळे जपा!
फटाके फोडताना काळजी घेण्याचे नेत्र तज्ञांचे आवाहन
ठाणे शहर, ता. १८ (बातमीदार) ः फटाके फोडणे लहान मुलांना खूप आवडते, मात्र ते फोडताना काळजी घेतली नाही, तर भाजणे आणि डोळ्यांना इजा होण्याची जास्त शक्यता असते. काही वेळा दृष्टी गमावण्याचीदेखील भीती असते. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेत फटाके फोडावेत, असे आवाहन जिल्हा नेत्र विभागाकडून करण्यात आले आहे.
प्रत्येक वर्षी दिवाळीनंतर देशभरातील नेत्र रुग्णालयांत शेकडो रुग्ण गंभीर दुखापतीसह दाखल होतात. सुतळी बॉम्ब फुटून ठिणगी उडाली, रॉकेटचा धूर डोळ्यांत गेला, फुलबाजीचा कण चेहऱ्यावर पडला असे प्रकार घडल्याने होत्याचे नव्हते होऊन बसते. त्यामुळे फटाके फोडताना खबरदारी घेणे हाच उत्तम साधा उपाय असल्याचे नेत्रतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
डोळ्यांना झालेली इजा नेहमी बाहेरून दिसत नाही. काही वेळा आतल्या स्तरांवर (रेटिना किंवा कॉर्निया) जखम होते आणि त्याचं परिणाम काही दिवसांनी दिसू लागतात. फटाक्यांमधील रसायनं आणि धूर डोळ्यांच्या आर्द्रतेवर आणि रक्तवाहिन्यांवर दुष्परिणाम करतात. यामुळे फॉरेन बॉडी इन आय, कॉर्नियल बर्न, रेटिनल ब्लीडिंग, इनफेक्शन अशी स्थिती निर्माण होत असल्याची माहिती विठ्ठल सायन्ना जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नेत्रतज्ज्ञ डॉ. शुभांगी अंबाडेकर यांनी सांगितले.
नेत्रपटलाला कायमचे नुकसान
फटाक्यांमधून निघणारी उष्णता १८०० अंश फॅरेनहाइटपर्यंत पोहोचते. म्हणजे साधारण लोखंड वितळेल इतकी तापमानाची तीव्रता असते. अशा ठिणगीचा छोटासा कणसुद्धा डोळ्यात पडल्यास नेत्रपटलाला कायमचे नुकसान पोहोचवू शकते. फुलबाजी, सुतळी बॉम्ब, रॉकेट, फाउंटन, अगदी साधी फुलबाजीसुद्धा असाच धोका निर्माण करू शकते.
फटाक्यांमधील धूर आणि रासायनिक घटक डोळ्यांसाठी अत्यंत घातक आहेत. ठिणगी उडाल्यावर लगेच थंड पाण्याने डोळे धुवा, पण स्वतःहून कोणतेही औषध किंवा मलम लावू नका. त्वरित नेत्र रुग्णालयात जा. उशीर म्हणजे धोका.
- डॉ. शुभांगी अंबाडेकर, नेत्रतज्ज्ञ, सिव्हिल रुग्णालय, ठाणे
ही काळजी घ्या :
फटाक्यांची ठिणगी उडाल्यानंतर डोळ्यांवर हात लावू नका.
डोळे चोळू नका.
मलम, आयड्रॉप किंवा अँटीबायोटिक स्वतःहून वापरू नका.
रॉकेट किंवा सुतळी बॉम्ब फोडताना चेहऱ्याजवळ झुकू नका.
गॉगल्स किंवा सुरक्षात्मक चष्मा वापरा.
वाऱ्याच्या दिशेने फटाके फोडू नका.
थंड पाण्याची बाटली जवळ ठेवा.
जखम झाल्यास त्वरित थंड पाण्याने धुवा आणि डॉक्टरांकडे जा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.