दिवाळीत निवडणुकीचा प्रचार
संभाव्य उमेदवारांकडून भेटवस्तूंच्या माध्यमातून मतदारसंवाद
वाशी, ता. २० (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची अंतिम प्रभागरचना निश्चित झाल्यानंतर शहरात पुन्हा राजकीय हालचालींना वेग आला आहे. आरक्षण सोडतीच्या प्रतीक्षेत असताना संभाव्य इच्छुकांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियासह सणांच्या माध्यमातून जनसंपर्क मोहीम आखली आहे. दिवाळीचे औचित्य साधत उमेदवारांनी फराळ, उटणे, पणती, मिठाई अशा भेटवस्तूंच्या माध्यमातून मतदारांच्या घराघरात आपली उपस्थिती नोंदवण्यास सुरुवात केली आहे.
कोरोनामुळे तब्बल साडेपाच वर्षांपासून रखडलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका अखेर जवळ आल्या आहेत. निवडणुकीची आचारसंहिता दिवाळीनंतर एका महिन्यात लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी जानेवारी महिन्यात निवडणुका होण्याचे संकेत मिळताच शहरातील आजी-माजी नगरसेवक तसेच नवे इच्छुक पुन्हा कार्यरत झाले आहेत.
या वर्षी दिवाळीच्या उत्साहात राजकारणाचा रंग चढल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. नागरिकांच्या मनात आपले स्थान निर्माण करण्यासाठी राजकीय इच्छुकांकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. उदा. रांगोळी व किल्ले स्पर्धा, दिवाळी पहाट कार्यक्रम, फराळ समारंभ तसेच महिलांसाठी उटण्याचे वितरण अशा माध्यमातून थेट जनसंपर्क सुरू आहे. सर्वाधिक लक्षवेधी बाब म्हणजे या सर्व वस्तूंवर उमेदवाराचे नाव, पक्षाचे चिन्ह आणि दिवाळीच्या शुभेच्छा संदेशांचे छाप देऊन अप्रत्यक्ष प्रचार सुरू करण्यात आला आहे.
फराळाचे पॅकेट, मिठाईचे बॉक्स, पणतीच्या पिशव्या, अगदी स्पर्धांच्या कूपनवरसुद्धा उमेदवारांची छायाचित्रे व पक्षाचे लोगो झळकत आहेत. काही इच्छुकांनी आपल्या सोशल मीडियावर या कार्यक्रमांची छायाचित्रे, व्हिडिओज टाकत आपली लोकप्रियता वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. मतदारसंघातील प्रत्येक प्रभागात अशा प्रकारच्या दिवाळी उपक्रमांची लाट दिसून येत असून, मतदारांचे मन जिंकण्यासाठी प्रत्येक जण स्वतःची ‘गोड’ शक्कल लढवताना दिसतो आहे.
.....................
कोरोनाच्या काळात जनतेसाठी केलेल्या कामांचा उल्लेख सोशल मीडियावर सातत्याने करण्यात येत आहे. त्याचबरोबर विकासकामांचे लोकार्पण, शुभेच्छा संदेश आणि स्वयंसेवी उपक्रमांच्या माध्यमातून इच्छुकांनी जनतेच्या नजरेत राहण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. दिवाळीच्या निमित्ताने सुरू झालेल्या या भेटवस्तू प्रचाराने निवडणूकपूर्व वातावरण अधिक रंगतदार झाले आहे. नागरिक मात्र या नव्या ट्रेंडकडे कुतूहलाने पाहात आहेत. आगामी काळात आचारसंहिता लागू झाल्यावर अशा उपक्रमांना लगाम लागेल, पण सध्या तरी नवी मुंबईत राजकारण आणि दिवाळी या दोन्हींचा एकत्रित उत्सव पाहायला मिळत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.