बदलापूर, मुरबाडचा वीजपुरवठा सुरळीत
कल्याण, ता. २३ (वार्ताहर) : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजे मंगळवारी (ता. २१) संध्याकाळी आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे उल्हासनगर, मुरबाड, अंबरनाथ आणि बदलापूर येथील सुमारे २८,००० वीजग्राहकांचा खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणने तातडीने पूर्ववत केला आहे.
महावितरणने दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड पाडा, उमरोली, सरळगाव, कानसाई गाव, भिडेवाडी, भीमनगर आणि हिल रोड परिसरातील सुमारे २८,००० वीजग्राहक वादळामुळे अंधारात गेले होते.
ऐन दिवाळीच्या दिवशी वीजपुरवठा खंडित झाल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन महावितरण यंत्रणा तत्काळ कामाला लागली. कल्याण मंडळ कार्यालय-२ चे अधीक्षक अभियंता विजय फुंदे यांनी माहिती घेऊन वीज अभियंता, जनमित्र आणि दुरुस्ती पथकांना त्वरित कामाला लावले. शक्य त्या ठिकाणी पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्राधान्य देण्यात आले. वादळी वाऱ्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून बंद केलेला वीजपुरवठा वाहिन्यांची तपासणी करून टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आला.
तीन रोहित्र नादुरुस्त
अवकाळी पावसामुळे परिसरात नऊ उच्च दाब (एचटी), २४ लघु दाब (एलटी) वीज खांब आणि तीन रोहित्र (ट्रान्स्फॉर्मर) मोडून पडले होते. तसेच, चार वीज उपकेंद्रातील १२ वीजवाहिन्यांवर परिणाम झाला होता.
बुधवारी दिवसभरात वीजवाहिन्यांची दुरुस्ती करून मोडून पडलेले खांब आणि रोहित्र पूर्ववत करण्यात आले. महावितरणने अत्यंत कमी कालावधीत वीजपुरवठा सुरळीत केल्याबद्दल कोकण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे आणि कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांनी अभियंता आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. व्यापारी आणि उद्योजकांनीही महावितरणच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.