‘इस्रो’त निवड झालेल्या तरुणाचा सन्मान
टिटवाळा, ता. २५ (वार्ताहर): नाशिक जिल्ह्यातील एका दुर्गम खेड्यातील तरुणाने आपल्या अथक परिश्रमाच्या बळावर थेट भारतीय अंतराळ संशोधन (इस्रो) या संस्थेत स्थान मिळवले आहे. आयटीआयमधून इलेक्ट्रिकल टेक्निशियन (इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक) म्हणून त्याची निवड झाली आहे. आपल्या गावाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या या तरुणाचा प्रवास प्रेरणादायी ठरला असून, टिटवाळा पोलिस ठाण्यात त्याच्या यशाचा एक हृदयस्पर्शी क्षण अनुभवण्यास मिळाला.
नोकरीसंदर्भातील पोलिस सत्यापन प्रक्रियेसाठी हा युवक काही काळ राहत असलेल्या कल्याण तालुक्यातील टिटवाळा परिसरात परत आला होता. पोलिस ठाण्यातील औपचारिक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंकज गिरी यांनी नेहमीच्या औपचारिकतेत न अडकता त्या तरुणाशी संवाद साधला. संभाषणादरम्यान हा तरुण ‘इस्रो’सारख्या प्रतिष्ठित आणि राष्ट्रीय अभिमानाच्या संस्थेत निवडला गेल्याचे कळताच निरीक्षक गिरी यांनी स्वतः पुढाकार घेऊन त्याचे कौतुक केले. गिरी यांनी त्याला मिठाई भरवली आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांनीही टाळ्यांच्या गजरात या युवकाचा सन्मान केला. क्षणभर पोलिस ठाण्याचे वातावरण आनंद, अभिमान आणि आपुलकीने भारले होते.
वर्दीतील माणूसही संवेदनशील
सामान्यतः लोकांच्या मनात पोलिसांविषयी कठोरतेची भावना असते. मात्र या घटनेने वर्दीतला माणूसही संवेदनशील, प्रेरणादायी आणि समाजाच्या यशात मनापासून आनंद मानणारा असतो, हा मानवी पैलू पुन्हा एकदा अधोरेखित केला. या घटनेमुळे ‘इस्रो’त निवड झालेल्या तरुणालाच नव्हे, तर त्याच्या गावकऱ्यांनाही अभिमान वाटला आहे. तर टिटवाळा पोलिसांनी दाखवलेल्या या मनमिळाऊ कृतीने पोलिस दलाची प्रतिमा अधिक उजळली आहे. वर्दीतला माणूस केवळ शिस्तीचा प्रतीक नाही, तर प्रेरणेचेही प्रतीक आहे, असे या लहानशा प्रसंगातून दिसून आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.