ठाण्यात २६ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरपर्यंत कोकण महोत्सव सोहळा
श्री भराडी देवी मंदिराची प्रतिकृती ठरणार मुख्य आकर्षण
ठाणे, ता. २४ (बातमीदार) ः ठाण्यातील स्वातंत्र्यवीर सावरकरनगर येथील पालिका शाळा क्र. १२०च्या मैदानावर कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कोकणातील शेती, पर्यटन, मत्स्यव्यवसाय, निसर्ग आणि संस्कृती या क्षेत्रांना जागतिक कीर्ती मिळावी, या उद्देशाने दरवर्षी हा महोत्सव भरविला जातो. यंदा २६ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या आठ दिवसांच्या कालावधीत सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत हा सोहळा पार पडणार आहे.
कोकण महोत्सवाचे यंदाचे हे १८ वे वर्ष असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग सामाजिक मंडळ, ठाणे आणि शिवसेना गटनेते माजी नगरसेवक दिलीप बारटक्के यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात कोकणातील पारंपरिक दशावतारी नाट्यसंस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या सुप्रसिद्ध नाट्यमंडळे पाच आकर्षक दशावतार नाटके आणि ट्रिकसिनयुक्त नाट्यप्रयोग सादर करणार आहेत. भजनाची डबलबारी, महिलांसाठी खास पैठणीचा खेळ, गंध मातीचा, रंग कलेचा या लोककलांवर आधारित कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, कोकणरत्न पुरस्कार वितरण, मुलांसाठी फनफेअर अशी विविध आकर्षणेही असतील. विविध विषयांवरील पुस्तकांचे स्टॉल्सही वाचकांना खुणावतील. दरवर्षीप्रमाणेच ठाण्यापासून वेंगुर्ल्यापर्यंत सुमारे दीड ते दोन लाख नागरिक या कोकण महोत्सवाला भेट देतील, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.
श्री भराडी देवी मंदिराची प्रतिकृती ठरणार आकर्षण
यंदाच्या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बांदिवडे गावातील श्री भराडी देवी मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात येणार आहे. कोकणच्या अस्सल चवीचा अनुभव देणारे मालवणी खाद्यपदार्थ, म्हावरा, खडखडे लाडू, खाजा, कुळिदाची पिठी, सुक्या माशांचे पदार्थ, कोकम, काजू, आंबा, फणसवडी, सावंतवाडी खेळणी, गंजिफा आणि मुगड्याचा झाडू यांसारख्या पारंपरिक वस्तूंचे स्टॉल नागरिकांना आकर्षित करणार आहेत.