बळीराजावर पुन्हा अस्मानी संकट
कापलेले पीक भिजल्याने मोठे नुकसान
अलिबाग, ता. २५ (वार्ताहर) ः ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाच्या मारा, सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाट त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पिकलेल्या भाताची नासाडी झाली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर आणि भातकापणीच्या वेळेवरच पाऊस झाल्याने बळीराजाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बळीराजा आपल्या शेतातील पीक वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
मागील काही महिन्यांपासून अवकाळी, परतीच्या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील भातपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यंदादेखील पावसाच्या भीतीपोटी उरलेसुरले भात पावसाची विश्रांती मिळताच पदरात पाडून घेण्यासाठी मेहनतीने प्रयत्न करीत असताना शेतकरीवर्ग दिसून येत आहे. त्यातच पुन्हा एकदा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जिल्ह्यात अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडला. दाणेदार कणीस, मोत्यासारखे धान जमीनदोस्त झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या कोपामुळे हिरावला जाण्याच्या मार्गावर आहे. रायगड जिल्ह्यातील अनेक भागांत परतीच्या पावसाने कापणीसाठी तयार ठेवलेले धान भिजून चिखलात बसले आहे. त्यामुळे बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेण्याची शक्यता आहे. पावसामुळे शेतात पाणी साचले असून कापलेल्या भाताच्या रोपांना कोंब येऊ शकतात, अशी भीती कृषितज्ज्ञांनी वर्तविली आहे. शेतातील पीक पूर्णतः झोपले असून काहींनी कापणी केलेले आणि ठेवलेले भाताचे गठ्ठे पुन्हा भिजले आहेत. अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्याने पीक घटण्याची शक्यता आहे. यावर्षी मे महिन्यापासूनच पाऊस सुरू झाला. त्यामुळे उन्हाळी पिकेदेखील मोसमी पावसाने नासवली. दरम्यान, शेतकऱ्यांनी पुन्हा खरीपाच्या लागवडीसाठी सज्ज होऊन नव्याने लागवड केली होती. त्यावरदेखील अनेक प्रकारची संकटे आली आणि त्यातून उरल्यासुरल्या पिकाची कापणी करीत असताना आता परतीच्या पावसाने पुन्हा धुडगूस घातल्याने शेतकरी राजा चिंतेत सापडला आहे.
..........
चौकट :
सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस जवळपास पाच हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना पावसाचा फटका बसला होता. आता पुन्हा एकदा पावसाने शेतकऱ्याचे नुकसान केले आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे एकूण पाच हजार ६४२ शेतकरी बाधित झाले असून, एक हजार ६९८.९२ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. यावर्षी झालेल्या अतिपावसामुळे शेतकरी अगदी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे लवकरात लवकर पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
..............
प्रतिक्रिया :
पावसाबरोबर आलेल्या वाऱ्यामुळे रायगड जिल्ह्यात भातपिकाचे नुकसान झाले आहे. कृषी विभागातर्फे नजर पंचनाम्यांचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याचा अहवाल लवकरच शासनाला सादर केला जाणार आहे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
- वंदना शिंदे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी, रायगड
..............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.