तर्खड ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेविकेचा उन्मत्तपणा
पालघर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश धुडकावले
गटविकास अधिकाऱ्यांच्या निर्देशांनाही केराची टोपली
विरार, ता. ४ (बातमीदार) ः वसई-तर्खड ग्रामपंचायतीच्या सरपंच ममता पाटील व ग्रामसेविका जागृती वडे यांनी पालघर जिल्हा परिषद कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश धुडकावल्याचे समोर आले आहे. यासोबत वसई गटविकास अधिकाऱ्यांच्या पत्रालाही केराची टोपली दाखवली आहे. याप्रकरणी ग्रामपंचायत सदस्यांनी या दोघांविरोधात अविश्वासाचा ठराव आणण्याचा निर्णय घेतला आहे.
तर्खड ग्रामपंचायत हद्दीतील आक्टन गावात चाफेकर कुटुंबीयांचे घर आहे. येथील एका विकासकाने चाफेकर कुटुंबीयांच्या लगतची जागा विकासाकरिता घेतली आहे. त्यात सात गुंठे क्षेत्राचे बावखल असल्याने व यावर बांधकाम करता येत नसल्याने त्याने लगतच्या चाफेकर कुटुंबीयांची घरपट्टी ममता पाटील व जागृती वडे यांना हाताशी धरून विकसकाच्या नावे केली आहे. शिवाय चाफेकर कुटुंबीयांची जुनी घरे बेकायदेशीर असल्याचे व त्या घरांवर कारवाई करावी, असे पत्र ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ममता पाटील व जागृती वडे यांनी पालिकेला दिले होते. दरम्यान, ग्रामपंचायतीच्या या बेकायदेशीर कार्यवाहीवर चाफेकर कुटुंबीयांनी आक्षेप घेतला. यासंदर्भात पालघर मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या समक्ष २४ जुलै रोजी सुनावणी झाली होती. या सुनावणीत चाफेकर कुटुंबीयांची घरपट्टी विकसकाच्या नावे करण्याचा निर्णय रद्द करण्याचे स्पष्ट आदेश ममता पाटील व जागृती वडे यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले होते, परंतु या आदेशाला तीन महिन्यांचा काळ लोटला तरी ममता पाटील व ग्रामसेविका जागृती वडे यांनी घरपट्टी चाफेकर कुटुंबीयांच्या नावे करून दिलेली नाही. यासंदर्भात विचारणा केली असता दिशाभूल करण्यात येत असल्याचीही सदस्यांची तक्रार आहे.
दरम्यान, वसई गटविकास अधिकाऱ्यांनीही पालघर मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या आदेशावर कोणती कार्यवाही केली? अशी विचारणा ममता पाटील व जागृती वडे यांना २७ ऑक्टोबरच्या पत्राद्वारे केली आहे. यासंदर्भात लेखी अहवाल आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत अन्यथा कारवाईचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला सादर करण्यात येईल, असा इशाराही सरपंच ममता पाटील व ग्रामसेविका जागृती वडे यांना दिलेला आहे, परंतु याकडेही दोघींनी दुर्लक्ष केलेले आहे. यामुळे तर्खड ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी आता त्यांच्याविरोधात असहकार पुकारला आहे.
आदेशात स्पष्टता नाही
यासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी ग्रामसेविका जागृती वडे यांच्याशी संपर्क साधला असता पालघर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा आदेश आपल्याला मान्य होता, पण सरपंच व सदस्य या निर्णयाबाबत संभ्रमात होते. त्यांना या प्रकरणात मार्गदर्शन हवे होते. त्यामुळे मासिक सभेच्या इतिवृत्तात मी तसे नमूद केलेले होते, तर सरपंच ममता पाटील यांनी म्हटले की, यासंदर्भातील मनोज रानडे यांच्या आदेशात स्पष्टता नसल्याने याविषयी त्यांच्याकडून मार्गदर्शन मागविण्याबाबत आम्ही मासिक सभेत चर्चा केली. त्या अनुषंगाने त्यांच्याकडून मार्गदर्शन मागविलेले होते, मात्र मार्गदर्शन मिळाले नसल्याने आम्ही संभ्रमात होतो, परंतु आमदार स्नेहा दुबे-पंडित यांच्या सूचनांनंतर तत्काळ आम्ही चाफेकर कुटुंबीयांची घरपट्टी त्यांच्या नावे केलेली आहे. याबाबतचा अहवालही गटविकास अधिकाऱ्यांना सादर करण्यात आला आहे, असा खुलासा त्यांनी केलेला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.