अलिबागमध्ये रस्त्यांची दयनीय अवस्था
पावसाने सर्वत्र खड्डे; नागरिकांमध्ये संतापाची लाट
अलिबाग, ता. ४ (वार्ताहर) : रायगड जिल्ह्यासह अलिबाग तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची अवस्था पुन्हा एकदा खड्डेमय झाली आहे. अलिबाग-वडखळ, अलिबाग-रोहा, तसेच ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे पावसामुळे पुन्हा उखडले असून, वाहनचालकांसह सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. पावसाळ्यानंतर काही काळ रस्त्यांवर खडी टाकून तात्पुरता डागडुजीचा दिखावा करण्यात आला होता; मात्र सलग पावसामुळे ही खडी वाहून गेल्याने ती जागा पुन्हा खड्ड्यांनी भरली आहे.
मागील काही वर्षांत अलिबागमध्ये पर्यटकांची संख्या लक्षणीय वाढली आहे. त्यामुळे सलग सुट्ट्या असल्या की शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक हजेरी लावतात, मात्र त्यादुष्टीने प्रशासन पर्यटकांना नागरी सुविधा देण्यात असक्षम ठरत आहे. येथील खड्डेमय रस्त्यांमुळे स्थानिकांसह पर्यटक, रुग्णवाहिका, गरोदर महिला, वृद्ध नागरिक आणि शाळकरी मुलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी खड्ड्यांत पाणी साचल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. रस्त्यांवरील दैनंदिन प्रवास त्रासदायक बनल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
ऑक्टोबरच्या अखेरीस झालेल्या अवकाळी पावसाने परिस्थिती अधिकच बिकट केली असून, ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून केवळ कारणे सांगितली जात आहेत. अलिबाग-वडखळ महामार्गावरील खड्ड्यांची स्थिती जैसे थे राहिल्याने राष्ट्रीय महामार्ग विभागावरही टीकेची झोड उठली आहे. नागरिकांनी रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून सुरक्षित प्रवासाची हमी द्यावी, अशी मागणी केली आहे.
..................
गेल्या काही वर्षांपासून अलिबाग तालुक्यातील रस्त्यांची हीच अवस्था असल्याची तक्रार नागरिक वारंवार करत आहेत. अनेक वेळा आंदोलने आणि मोर्चे काढून खड्डे भरण्याची मागणी करण्यात आली; पण प्रत्येकवेळी केवळ तात्पुरते उपाय केले गेले. यंदाही जुलै-ऑगस्ट महिन्याच्या मध्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे भरण्याचे काम केल्याचा दावा केला होता, मात्र या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचे आता उघड झाले आहे. गणपतीपूर्वी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर अधिकाऱ्यांनी तातडीने काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते, पण प्रत्यक्षात काहीच बदल दिसून आलेला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.