घरकुल बांधणीत पालघर अव्वल
राज्यस्तरीय पथकांची पालघर जिल्ह्यात पाहणी; सौरऊर्जा प्रकल्पांवर भर
पालघर, ता. ५ (बातमीदार) ः मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामीण गृहनिर्माण विभागाच्या राज्यस्तरीय अधिकाऱ्यांनी पालघर जिल्ह्यातील विविध तालुक्यांना भेट देऊन योजनांच्या प्रगतीचा आढावा घेतला. राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयामार्फत तीन पथके तयार करण्यात आली असून, त्यांनी डहाणू, वाडा अशा तालुक्यांमध्ये ३० ऑक्टोबर रोजी क्षेत्रीय पाहणी केली.
संचालक डॉ. राजाराम दिघे, अपर आयुक्त डॉ. माणिक दिवे, डॉ. संघारत्न सोनावणे आणि विभाग प्रोग्रामर शरद पवार यांनी डहाणू तालुक्यातील कासा व गंजाड ग्रामपंचायतींना भेट देत घरकुलांची आणि रोजगार मस्टरची पाहणी केली. उपसंचालक राजलक्ष्मी येरपुडे आणि राज्य वस्तुविशारद परमेश्वर शेलार यांनी वाडा तालुक्यातील नेहरोळी ग्रामपंचायतीत उभारलेल्या पीएम जनमान वसाहतीची पाहणी केली. तर उपसंचालक डॉ. सचिन पांझडे आणि दिनेश मोवाळे यांनी तालुक्यातील दुर्वेस व नांदगावतर्फे मनोर येथील घरकुलांची पाहणी केली. या सर्व भेटींदरम्यान प्रकल्प संचालक डॉ. रुपाली सातपुते, गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते, घरकुल विभाग आणि मनरेगा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
अभियंत्यांचा गौरव
क्षेत्रीय पाहणीनंतर जननायक बिरसा मुंडा सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत सर्व उपक्रमांची प्रगती तपासण्यात आली. जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) आणि पीएम जनमान आवास योजनेंतर्गत सर्वाधिक घरकुले पूर्ण करणाऱ्या अभियंत्यांचा राज्य संचालक डॉ. राजाराम दिघे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. पालघर जिल्हा राज्यात घरकुल मंजुरी व हप्ता वितरणात प्रथम क्रमांकावर असल्याने संपूर्ण घरकुल टीमचे अभिनंदन करण्यात आले.
३१ डिसेंबरपूर्वी सर्व घरकुले पूर्ण करण्याचे निर्देश
बैठकीत ३१ डिसेंबरपर्यंत सर्व मंजूर व अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यात यावीत, भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून द्यावी, सर्व लाभार्थ्यांना मनरेगाअंतर्गत लाभ देण्यात यावेत आणि पंतप्रधान सूर्यघर योजना किंवा संबंधित योजनांद्वारे मंजूर घरकुलांवर सौरऊर्जा प्रकल्प बसविण्याची प्रक्रिया गतिमान करण्याचे निर्देश देण्यात आले. जिल्ह्यात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर भर देण्याचे सांगितले.
या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, प्रकल्प संचालक डॉ. रुपाली सातपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अशोक पाटील, जिल्हा कार्यक्रम समन्वयक अतुल पारसकर सर्व तालुक्यांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठकीत प्रलंबित मस्टर पूर्ण करणे, सौर प्रकल्प स्थापनेची प्रक्रिया गतिमान करणे आणि सर्व प्रलंबित घरकुलांची कामे निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले.
फोटो : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज घरकुलांना भेट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.