कुष्ठरोगमुक्त रायगडसाठी मोहीम
२३ लाख ३० हजार ८७१ नागरिकांचे सर्वेक्षण
अलिबाग, ता. ५ (वार्ताहर) ः रायगड जिल्ह्यात कुष्ठरोग्यांची संख्या २०२७ पर्यंत शून्यावर आणण्यासाठी जिल्हा प्रशासन काम करीत आहे. याच अनुषंगाने १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत कुष्ठरोग शोधमोहीम अभियान राबवण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकसंख्येचे १०० टक्के, शहरी भागातील जोखीमग्रस्त ३० टक्के लोकसंख्येची प्रत्यक्ष तपासणी करण्यात येणार आहे. याच अनुषंगाने आशा सेविका, स्वयंसेवक जिल्ह्यातील पाच लाख सहा हजार ८४१ घरांना भेटी देऊन २३ लाख ३० हजार ८७१ लोकसंख्यंचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. निदान न झालेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर औषधोपचार करणे, नवीन कुष्ठरुग्ण शोधून संसर्गाची साखळी खंडित करणे, समाजात कुष्ठरोगाविषयी जनजागृती करणे, या दिशेने जिल्हा प्रशासन काम करणार आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी सांगितले.